पनीर कोफ्ता करी

साहित्य :

 • दीड ते २ लिटर दूध
 • १ वाटी दही (पनीरकरण्यासाठी)
 • १ लिंबू
 • ४ ब्रेडचे स्लाईसेस
 • ४ हिरव्या मिरच्या
 • २ मोठे चमचे कॉर्नफ्लॉअर किंवा डाळीचे पीठ
 • अर्धी वाटी दही
 • २ चिमट्या बेकिंग सोडा
 • अर्धीवाटी मटारदाणी
 • दीड चमचा गरम मसाला
 • दीड चमचा तिखट (कमीही चालेल)
 • चवीनुसार मीठ
 • पावचमचा आमचूर (असल्यास)
 • २ कांदे
 • ४ लसूणपाकळ्या
 • अर्धा इंच आले
 • ३ मोठे चमचे तेल
 • २५० ग्रॅम टोमॅटो
 • १ चमचा धनेपूड
 • अर्धा चमचा जिरेपूड
 • अर्धा चमचा साखर
 • तळणीस तेल.

कृती :

पनीर कोफ्ता करी

पनीर कोफ्ता करी

दुधाचे पनीर तयार करावे (दही व लिंबू वापरावे).ब्रेडचे स्लाईसेस थोड्या पाण्यात भिजवावे व घट्ट पिळावे. पनीर कुस्करावे व त्यात ब्रेड मिसळावा. कांदे, लसूण व आले एकत्र वाटावे. मटारदाणे वाफवावे किंवा कुकरमध्ये शिजवावे व बारीक वाटावे किंवा हलकेच ठेवावे. मिरच्यांचे बारीक तुकडे चिरावे. पनीरमध्ये मिरच्या, मटारदाणे, अर्धी वाटी दही, डाळीचे पीठ, सोडा व आमचूर थोडी कोथिंबीर घालून मिश्रण मळावे. त्याचे सुपारीएवढी गोळे करून कढईत बदामी रंगावर तळावे. कागदावर निथळत बाजूला ठेवावे. टोमॅटोचा मिक्सरमध्ये किंवा पुरणयंत्रावर रस काढावा.

कोफ्ते तळल्यानंतर कढईत तेल उरेल त्यातले तीन मोठे चमचे तेल दुसऱ्या पातेल्यात घालावे. तेल तापले की त्यावर वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतावा. टोमॅटोचा रस, मीठ, तिखट, धनेपूड, जिरेपूड व साखर घालावी. दोन‍अडीच वाट्या पाणी घालून मंद विस्तवावर करी उकळत ठेवावी. ७-८ मिनिटांनंतर उतरावावी. वाढण्यापूर्वी पुन्हा गरम करावी. उकळी आली की कोफ्ते घालून लगेच खाली उतरवावे नाहीतर कोफ्ते मोडून जातात.

मटारदाणे नसल्यास वगळावे व नुसतेच पनीरचे गोळे करून तळावे.