पाण्यात पाहणारे सांबर

एक सांबर नदीतवर पाणी पीत होते त्याने आपले प्रतिबिंब पाण्यात पाहिले, तेव्हा आपल्या सौंदर्याबद्दल त्यास फार समाधान वाटले. मग पायांपासून डोक्यापर्यंत आपले सगळे अवयव न्याहाळून ते म्हणते, ‘माझ्या डोक्यावरील शिंगांचा जोड किती सुंदर आहे ! त्यामुळे माझे तोंड किती सुरेख दिसते ! माझे डोळे कसे कमळासारखे विशाळ आहेत ! मऊ फुलासारखे माझे अंग आहे. असेच जर माझे हे पाय सुंदर असते तर तर काय बहार झाली असती पण काय काय करावे, यांनी मला लाज आणली ! हे इतके बारीक पाय असण्यापेक्षां, ते मुळीच नसते तरी बरे होते.’ या प्रमाणे ते सांबर आपल्या पायांची निंदा करीत असता, तेथे एक सिंह आला व त्या सांबरावर उडी टाकण्याकरिता लपून राहिला. त्याची चाहूल लागताच सांबर तेथून पळाले; सिंहही त्याच्या मागे लागला. सिंहास चुकवून आपला जीव वांचविण्यासाठी सांबर आडवाटेने पळू लागले. तो त्याची शिंगे झाडीत गुंतल्यामुळे, ते अडकून पडले ! त्यास पाहतांच सिंहाने त्याजवर झडप घातली, त्या वेळी ते म्हणते, ‘हाय हाय ! ज्या पायांची मी इतकी निंदा करीत होते, त्यांनी तर संकटातून माझी सुटका केली; परंतु ज्या शिंगांबद्दल मी गर्व वहात होते, त्यांनीच आयत्या वेळी मला दगा दिला !’

तात्पर्य:- शोभेपेक्षा उपयोगाकडे विशेष लक्ष असावे.