पापडी चाट शंकरपाळ्याची

साहित्य :

  • २५० ग्रॅम मैदा
  • अडीच वाट्या तूप किंवा डालडा
  • दीड चमचा मीठ
  • १ चमचा ओवा
  • १ चमचा ताजी मिरपूड
  • १ चमचा गरम मसाला
  • १ चमचा जिरेपूड
  • अर्धा चमचा काळे मीठ (सैंधव)
  • पाव चमचा हिंग
  • २ वाट्या घट्ट ताजे दही.

कृती :

पापडी चाट शंकरपाळ्याची

पापडी चाट शंकरपाळ्याची

मैदा चाळून घ्यावा. त्यात चमचाभर मीठ, अर्धी वाटी तूप व ओवा घालावा. गरम पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे. दहापंधरा मिनिटे झाकून ठेवावे. त्याचे ४ किंवा पोळपाट लहन असल्यास पाच गोळे करावे. प्रत्येक गोळ्याची पातळ पोळी लाटावी व १ इंचाचे चौकोनी शंकरपाळे सुरीने कपावे. कढईत तूप कडकडीत तापले की आंच मंद करून गुलाबी रंगावर शंकरपाळे तळावे. ताटात-कागदावर निथळावे. गार झाले की डब्यात भरून ठेवावे.

वाढण्यापूर्वी दही घुसळावे व त्यात अर्धा चमचा मीठ घालावे. खायला घेताना प्लेटमध्ये थोडे शंकरपाळे घालून त्यावर दही घालावे. मिरपूड, गरममसाला, जिरेपूड, काळे मीठ व हिंगाची पूड एकत्र मिसळावी व ती थोडीथोडी वरून भुरभुरावी व लागलीच खायला घ्यावी.

वेळ असल्यास याच पिठाच्या छोट्या गोल पुऱ्या तळाव्यात ( भेळेच्या पुऱ्यासारख्या) व उकडलेले बटाटे दह्यात त्याबरोबर घालावेत. आवडीनुसार चिंचेची गोड चटनी, बारीक चिरलेली कोथिंबीर व शेव वरून घातल्यास छान चव लागते.

लहान मुलांच्या पार्टीला हा प्रकार सर्वांना आवडतो.