आता पोस्ट स्टॅम्पवर झळकणार तुमचा फोटो

आता पोस्ट स्टॅम्पवर झळकणार तुमचा फोटो

आता पोस्ट स्टॅम्पवर झळकणार तुमचा फोटो

यापुढे आता माझा , तुमचा किंवा कुणाचाही फोटो असलेले टपाल तिकीट , तेसुद्धा १० मिनिटात प्रकाशित करता येणार आहे.

भारतीय टपाल खाते ‘ मायपोस्ट ‘ नावाची योजना सुरु करत असून दिल्लीत पुढील आठवड्यात होणार्‍या ‘ इंडिपेक्स २०११ ‘ या टपाल तिकीटांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातून याची सुरुवात होणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास पोस्ट ऑफिसात गेल्यावर तुम्हाला केवळ दहा मिनिटातच तुमचा फोटो असलेले पोस्ट स्टॅम्प हातात पडणार आहे. यासाठी अर्थातच तुम्हाला १५० रुपये किंमत मोजावी लागणार आहे. ‘ इंडिपेक्स २०११ ‘ च्या संचालक कावेरी बॅनर्जी यांनी ही माहिती दिली. देश-विदेशातल्या टपाल तिकीट संग्रहाकांसाठी पर्वणी ठरणारे हे प्रदर्शन दिल्लीच्या प्रगती मैदानवर १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले जाणार आहे.

‘ पर्सोनलाइज्ड स्टॅम्प ‘ ची संकल्पना जगातल्या अनेक देशांमध्ये रुढ आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव भारतात या योजनेची अद्याप सुरुवात झालेली नव्हती. पण माहिती तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे संवादाच्या क्षेत्रात आलेल्या क्रांतीमुळे टपाल खात्यावर अवकळा आली. पोस्ट कार्ड , अंतर्देशिय पत्रे आणि लिफाफ्याची जागा ई-मेल आणि एसएमएमने घेतली.

परिणामी गेल्या काही वर्षात टपाल तिकीटांच्या विक्रीत मोठी घट झाली. या बदललेल्या परिस्थितीत लहान मुले व तरुण वर्गाला टपाल सेवेकडे आकृष्ट करण्यासाठी या खात्यातर्फे अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. नव्याने दाखल करण्यात येणारा ‘ पर्सोनलाइज्ड स्टॅम्प ‘ हा त्या योजनेचा भाग असल्याचे बॅनर्जा यांनी सांगितले.