गणपती बप्पाच्या मुर्तिंचा वाद सुप्रीम कोर्टात

गणपती बप्पाच्या मुर्तिंचा वाद सुप्रीम कोर्टात

गणपती बप्पाच्या मुर्तिंचा वाद सुप्रीम कोर्टात

गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) ऐवजी शाडू मातीने बनवण्याच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर सार्वजनिक गणेशमंडळे आणि मूर्तिकारांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. या निर्णयाचा राज्यातील ४५ हजार कारागिरांवर थेट दूरगामी परिणाम होणार आहे. या निर्णयाविरोधात बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत सुमारे तीन लाख घरगुती गणेशमूर्ती पूजल्या जातात; तर सार्वजनिक मंडळांची संख्या २५ हजारावर जाते. या व्यवसायावर केवळ मुंबईतच २५ हजार कुटुंबे अवलंबून असून राज्यभरात ही संख्या ४५ हजारांवर पोहोचते. त्यामुळे जवळपास अडीच लाख लोकांना याची झळ पोहोचू शकते, अशी माहिती प्रख्यात मूर्तीकार विजय खातू यांनी दिली.

शाडूपासून उंच मूर्ती बनवणे जोखमीचे असून त्याची किंमतही भरमसाठ वाढत जाते. पीओपीची आणि शाडूच्या मूर्तीच्या किमतीत किमान १०पट फरक पडत जातो. त्यामुळे सर्वसामान्य भाविक, सार्वजनिक मंडळांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांचा असलेला प्रचंड तुटवडा ही मोठी समस्या ठरू शकते. अशी स्थिती असतानाच यावषीर् जवळपास तयार स्वरूपात असलेल्या लाखो मूर्तींचे भवितव्य काय, असा प्रश्न मूर्तीकारांसमोर आ वासून उभा राहिला आहे.

हा निर्णय पर्यावरणानुरूप असला तरी त्याच्या अमलबजावणीसाठी सरकारने आथिर्क सहाय्य देतानाच त्यासाठी किमान काही वर्षांचा कालावधी उपलब्ध मिळावा, अशी मागणी पुढे येत आहे. मुळात हा व्यवसाय विविध संकटात सापडला असतानाच हा नवा निर्णय आमच्यासाठी मारक ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया अनेक मूर्तीकारांनी व्यक्त केली.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये याविषयी संमिश्र प्रतिक्रिया आहेत. गणेशगल्ली सार्वजनिक मंडळाचे सचिव स्वप्नील परब यांनी शाडू मूर्तीमुळे बजेटवर परिणाम होऊन त्यातून सामाजिक उपक्रमास फटका बसण्याची शक्यता वर्तवली. त्यात शाडूच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले; तर, फोर्टमधील इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रवी सुर्वे यांनी पर्यावरणाच्यादृष्टीने हा चांगला निर्णय आहे. आम्ही त्याचे पालन करणार असल्याचे स्पष्ट केले.

मात्र, पीओपीच्या तुलनेत शाडूच्या मूर्तीचे वजन अधिक असून किंमतही जास्त होते. पीओपीच्या तुलनेत शाडू मूर्ती साकारणे आव्हानात्मक असते. माती मळण्यापासून त्यात कौशल्याची आवश्यकता असते, तसे कामगार मिळणे कठीण असल्याचे मूर्तीकार चंदकांत बागवे यांनी सांगितले.

मुंबईत जीसीएबी सार्वजनिक मंडळ, गिरगावचा राजा, मुगभाट मंडळ, दहिसर श्री विठ्ठल मंदिर अशा मोजक्याच मंडळात शाडूच्या मूर्तींची परंपरा आहे. गिरगावचा राजा २३ फूट असून त्यामागे ८० वर्षांचा इतिहास असल्याचे मूर्तीकार राजन पाटकर सांगतात. यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत असल्याचे ते आवर्जून सांगतात.