वर्‍हाडी मंडळींवर नियतीचा घाव

Pune Mumbai Expressway Accident

रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’ वर एका ट्रकने वर्‍हाडाच्या टेम्पो ट्रॅव्हलरला जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला आणि २९ जण गंभीर जखमी झाले. १४ महिला आणि चार लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. हा टेम्पो टॅव्हलर टायरचे पंक्चर काढण्यासाठी खालापूर टोल नाक्याजवळील धामणी गावाजवळ रस्त्याच्या कडेला थंबला होता. ट्रकचालक सोमनाथ ज्ञानदेव फडतरे (वय २५, रा. सुलतानवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) ह्याने भरधाव वेगाने ट्रक चालवल्यामुळे हा अपघात घडला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चौकशीत त्याने ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडल्याचा दावा केला आहे. दोन दुसर्‍या जीपमधून प्रवास करणारे नवविवाहित वधू-वर, त्यांचे आई-वडिल व जवळचे नातेवाईक पुण्याकडे येत असल्याने ह्या अपघातातून सुदैवाने बचावले.

घाटकोपर येथे लक्षमीनगरचे एकनाथ बबन बहुले ह्यांचा रविवारी (२७ मे) लग्न समारंभ होता. लग्नकार्य उरकून रात्री साडे दहा वाजता दोन वेगवेगळ्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून ही वर्‍हाडी मंडळी परतीच्या प्रवासाला निघाली. एका बसचे चाक खालापूर जवळ पंक्चर झाले. ते चाक बदलण्यासाठी दुसऱ्या बसमधला चालक मदतीसाठी धावला. दोन्ही चालकांनी गाड्या रसत्याच्या कडेला असलेल्या सर्व्हिस लेन मध्ये नेल्या. आपापल्या बसमधून उतरुन वर्‍हाडी मंडळी हायवेच्या कडेला जाऊन थांबली होती. कार्याच्या धावपळीमुळे डुलक्या घेत काही जणं बसली होती. लहान मुले काही जणांच्या मांडीवर होती. पण नियतीने अचानक ह्यांच्यावर घाव घातला. पुण्याच्या दिशेने एक भरधाव ट्रक आला व चालकाचा स्टिअरींगवरील ताबा सुटल्यामुळे त्याने रस्त्यावर बसलेल्या वर्‍हाडी मंडळींना चिरडले आणि दोन्ही बसना जोरदार धडक दिली.

ह्या भीषण अपघातात १५ जण जागीच गेले. अतिशय नाजूक स्थिती जखमींची झाली होती. जखमी जणांना टोलनाक्याजवळील कर्मचार्‍यांनी व पोलिसांनी तातडीने नऊ अ‍ॅम्ब्युलन्सच्या मदतीने पनवेल येथील अष्टविनायक, गांधी, पॅनासिना आणि कामोटी येथील एमजीएम आदि रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. खोपोली मधल्या शवविच्छेदन केंद्रात मृतदेहांना नेण्यात आले. कोकण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक परमवीर सिंह, पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे, खालापूरचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.

वाहन चालकांनी लक्षपूर्वक आपल्या गाड्या चालविल्या पाहिजे म्हणजे असे भीषण अपघात टळतील आणि आपल्यावर अशा प्रकारचा काळा दिवस बघायची वेळ येणार नाही.