विलासराव देशमुख यांना पुणेकरांकडून श्रद्धांजली

विलासराव देशमुख

विलासराव देशमुख

महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अचानक निधनाने देशाला खूप मोठे नुकसान झाले आहे. ते स्वभावाने अत्यंत दिलखुलास व मिश्कील होते व कुशल राजकारणी सुद्धा होते. रविवारी देशमुख यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘सोडुनी आज गेला तो राजहंस एक’ अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली.

विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन पुणे शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. विलासरावांच्या आठवणींना उजाळा देत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ही सभा बालगंधर्व रंगमंदिरात भरली गेली होती व या सभेत विलासरावांच्या सुहृदांनी गर्दी केली होती. विलासरावांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय, सांस्कृतिक, अल्पसंख्याक समाज, शैक्षणिक, साहित्य, विधी अशा विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विलासरावांना श्रद्धांजली वाहिली. ‘उमदे व्यक्तिमत्त्व, विचारांमध्ये सुस्पष्टता, प्रेमळ स्वभाव हे गुण विलासरावांमध्ये होते. त्यांनी कधीही समाजाकडे मान-सन्मान मागितला नाही, तर आपल्या कर्तृत्वाने त्यांनी तो मिळवला’ अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. कामगार नेते बाबा आढाव यांनी सांगितले की, ‘विलासरावांच्या मनात कामगारवर्गाबाबत विशेष आस्था होती. ते आमच्या चळवळीचे ‘मित्र’ होते. ते सर्वांचा आदर करत असे.’ माजी आमदार उल्हास पवार म्हणाले की, ‘फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशालाच विलासरावांच्या जाण्याने नुकसान झाले आहे. त्यांनी कधीही आपल्या राजकीय आयुष्यात मतभेद व्यक्त केले नाहीत. त्यांनी कधीही छोट्या गोष्टींचे मार्केटिंग केले नाही. ते सदैव तळागळातील लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असत.’

‘विलासरावांवर जातीयवादाचे अथवा भ्रष्टाचाराचे आरोप कधीही झाले नाहीत. ते खेळकर वृत्तीचे होते व सर्वांना हसत-खेळत घेऊन चालणारे नेते होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने मराठवाड्याचे नेतृत्व हरपले,’ ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांनी सांगितले की, ‘सर्वसामान्यांना विलासराव सोडून गेले. विलासरावांनी नेहमी छोट्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्याचे काम केले.’

आमदार गिरीश बापट यांनी आठवणी सांगितल्या की, ‘सभागृहात कटू प्रसंगांच्या वेळी तणाव न घेता त्यांना सामोरे कसे जायचे याचे विलासराव हे एक उत्तम उदाहरण होते. विरोधी पक्षाशीही वैर न बाळगता त्यांना एकत्र घेऊन विलासरावांनी अनेक विकासाचे निर्णय घेतले. राजकारणात त्यांचे कोणाशीही शत्रुत्व नव्हते.’

आमदार शरद रणपिसे, ‘वनराई’चे मोहन धारिया, महापौर वैशाली बनकर, कुमार सप्तर्षी, सिद्धार्थ धेंडे, पी. ए. इनामदार, रामदास फुटाणे, श्रीकांत शिरोळे, वसंत मोरे, देविदास भन्साळी यांनीही विलासरावांना श्रद्धांजली वाहिली.