मनसे घेणार ठोस भूमिका

राज ठाकरे

राज ठाकरे

‘सामान्य जनतेने रस्त्याच्या विकासासाठी टोल का आणि किती दिवस भरायचा? आम्हाला राज्यातील टोल नाक्यांचा अहवाल मिळाला आहे व येत्या आठ दिवसांत ठोस भूमिका घेणार आहे,’ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही माहिती दिली.

मनसेने राज्यभर अवैध टोल वसूलीच्या विरोधात पंधरा दिवसांत वाहन मोजणी अभियान राबविले होते. ‘टोल नाक्यांचे अहवाल राज्यभरातून मिळाले आहेत व या फायलींनी चार-पाच कपाटे भरली आहेत. या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करायला वेळ लागणार आहे पण, येत्या आठ दिवसांत अभ्यासपूर्वक भूमिका या टोलबाबत घेतली जाईल. पावसाळी अधिवेशनासाठी फक्त टोलचा मुद्दा हातात घेतला नव्हता. खरा प्रश्न हा आहे की सामान्य जनतेने टोल का भरावा,’ असे राज ठाकरे म्हणाले.

शिवसेने टीका केली होती की मनसेचे टोलविरोधीचे आंदोलन हप्त्यासाठी केले जात आहे. हा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले, ‘दुसऱ्यांवर टीका करण्याची त्यांची खूप जुनी सवय आहे. स्वतः मात्र रिकामे बसायचे आणि दुसऱ्याने काही केले तर लगेच टीका करायची. अशा टीकांकडे मी दुर्लक्ष करतो.’

सोमवारपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. राज यांनी स्पष्ट केले की, ‘मुंबई मंत्रालयाला लागलेली आग, वाघांची शिकार, वेगवेगळ्या क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मनसेचे विधानसभा सदस्य या अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतील. राज्य अनेक समस्यांनी पोखरले असून, त्यांची तड लावण्याची थेट भूमिका घेण्याची गरज आहे.’ राज्यभर २००७ मध्ये रेल्वे भरती प्रकरणीचे आंदोलन झाले होते. माजलगाव आणि गेवराई तालुक्यात राज यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. दोन्ही तालुक्यांच्या कोर्टात हजर राहण्यासाठी औरंगाबादहून राज रवाना होतील.