गणेशोत्सवापूर्वी पुणे स्फोटातील आरोपींचा नंबर

राकेश मरिया

राकेश मरिया

दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख (एटीएस) राकेश मरिया यांनी बुधवारी सांगितले की, ‘पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या संशयित आरोपींवर आमची नजर आहे. गणेशोत्सवापूर्वी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे व त्यासाठी आम्ही जीव तोडून प्रयत्न करत आहोत’.

एक ऑगस्टला जंगली महाराज रोडवर चार ठिकाणी एका मगोमाग एक बॉम्बस्फोट झाले होते. दोन ठिकाणी लावलेले बॉम्ब निकामी करण्यात आले होते. ‘एटीएस’कडे या गुन्ह्याचा तपास दिला आहे व त्यासाठी मारिया एक महिना पुण्यात मुक्काम करणार आहेत.

‘कोणत्याही स्फोटाचा खूप खोलवर जाऊन तपास केला जातो. आरोपींना तुरुंगात टाकेपर्यंत तपासाची माहिती देणे अयोग्य आहे. पुणे स्फोटांचा तपासही अत्यंत बारकाईने केला जात आहे. माझ्या बरोबरच दोन पोलिस उपमहानिरीक्षक, पाच पोलिस उपायुक्त तर ३५० अधिकारी व कर्मचारी या योजनेमध्ये कार्यरत आहेत’, असे मारिया म्हणाले.

‘राज्य सरकारकडून आम्हाला आदेश देण्यात आले आहेत की पुणे स्फोटांचा तपास गणेशोत्सवापूर्वी झालाच पाहिजे. हा तपास लवकर पूर्ण करण्यासाठी आणि आरोपींना तुरुंगात टाकण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही आश्वासन देतो की या गुन्ह्यातील सर्व आरोपी लवकरात लवकर गजाआड होतील. स्फोटात जे मटेरिअल वापरण्यात आले होते त्याचा अहवाल फॉरेन्सिक लॅबकडून पाठविण्यात आला आहे व त्यात अमोनियम नायट्रेट, पेट्रोलियम कार्बन ऑईल वापरल्याचे समजते. या अहवालात म्हटले आहे की, स्फोटाकांतील ‘आयईडी’ची क्षमता कमी होती’, असे मारिया यांनी स्पष्ट केले.