रव्याचा निराळा सांजा

साहित्य :

  • २०० ग्रॅम बारीक रवा
  • २ चमचे बेदाणे
  • ८-१० काजू किंवा शेंगादाणे (दुप्पट घ्यावे)
  • ४ वेलदोडे
  • १ चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धी वाटी तूप
  • १ चमचा मीठ (किंवा चवीनुसार)
  • २ चमचे ओले खोबरे

सजावटीसाठी :

  • कैरीचे किंवा टूटीफ्रूटीचे तुकडे

कृती :

रव्याचा निराळा सांजा

रव्याचा निराळा सांजा

बेदाणा पंधरा मिनिटे पाण्यात भिजवावा. काजूचे छोटे तुकडे करावे. कच्चे शेंगदाणे असल्यास तासभर पाण्यात भिजवावे. भाजलेले असल्यास साल काढून अर्धे करून ठेवावे. वेलचीची पूड करावी. रवा चाळून घ्यावा. कढईत कोरडाच पाचसात मिनिटे भाजून बाजूला ठेवावा. दुसऱ्या पातेल्यात तूप तापले की त्यात काजू व बेदाणे घालावे.

काजू बदामी रंगावर परतावे. त्यात दोन कप गरम पाणी, तिखट, हळद, वेलचीपूड व मीठ घालावे. पाण्याला उकळी आली की डाव्या हाताने थोडाथोडा रवा घालावा. मंद विस्तवावर एकीकडे उजव्या हाताने ढवळत राहावे. सात-आठ मिनिटात रवा शिजतो व पाणी जिरते. त्यानंतर खाली उतरवून पाच मिनिटे झाकून ठेवावे.

सुबकशा भांड्यात काढून त्यावर ओले खोबरे व असल्यास कैरीचे बारीक तुकडे किंवा टूटीफ्रूटीचे तुकडे घालावे. ठराविक सांजा, शिरा व उपमा खाऊन कंटाळलेल्या किशोर कंपनीसाठी हा नवा प्रकार जरूर करून पाहावा.