टिळकांची गर्जना पोहोचणार लंडनला

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

केसरी ट्रस्टकडे लंडन मध्ये राहत असलेल्या भारतीयांनी मागणी केली आहे की पुण्यात, लोकमान्य टिळकांची जी दुर्मिळ ध्वनिफित ऐकविण्यात आली होती, ती ध्वनिफित त्यांना ही उपलब्ध करुन द्यावी.

‘सर्वच भारतीयांच्या हृदयात लोकमान्य टिळकांविषयी नितांत आदर व अभिमान आहे. आम्ही जरी भारतापासून सातासमुद्रापार असलो तरी भारताशी असलेले आमचे नाते अतूट आहे. लोकमान्य टिळकांची ध्वनिफित ऐकायला मिळाल्यास आम्ही स्वतःला भाग्यवान समजू’, अशी भावना लंडन मध्ये स्थित श्रीपाद गिरी यांनी व्यक्त केली.

गिरी यांनी अपेक्षा व्यक्त केली की, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, ही लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना आम्हां परदेशात राहणाऱ्या भारतीयांना नेहमीच प्रेरणादायी ठरते. त्यामुळे हा दुर्मिळ ठेवा जगभरातील प्रत्येक भारतीयाला मिळावा. ही ध्वनिफित जर वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलीत तर, स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान देणाऱ्या टिळकांचा भारदस्त आवाज प्रत्येक भारतीयाला ऐकाला मिळेल.

शैलेश चौधरी, हे गिरी यांचे मित्र असून ते केसरी ट्रस्टसोबत याबाबत संपर्कात आहेत. लवकरच टिळकांच्या आवाजाची सी. डी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.