समस्या-पूर्ती

माळव्याचा राजा भोज अज ‘धारानगरी’ या आपल्या राज्याच्या राजधानीत रहात होता. राजा असा प्रजाहितदक्ष व विद्वान होता, तसाच रसिक होता. त्यामुळे त्याच्या पदरी कालीदासासारखे कवी व महापंडित होते.

एकदा भोजराजाच्या राजवाड्यात पहिल्या मजल्यावरील आपल्या शयनमंदिरात राणीची वाट पहात बसला होता. त्याच वेळी राणी तळमजल्यावरून शयनमंदिराकडे जाण्य़ासाठी जिन्याच्या पायऱ्या चढू लागली. पायऱ्या चढत असता, पतीबद्दलच्या विचारांच्या तंद्रीत तिचं एक पाऊल चुकीचं पडून, तिचा तोल गेला, आणि तिच्या हातातील-चंदनलेप असलेली सोन्याची वाटी पडून तो ‘ठण ठण ठण ठण’ असा आवाज करीत गडगडत जिन्याच्या तळापर्यंत गेली.

भोजराजानं ही घटना लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी ‘नवरत्नांनी’- म्हणजे नऊ कवी-पंडितांनी-भरलेल्या आपल्या दरबारात एक ‘समस्या’ पूर्ण करण्यासाठी मांडली. तो म्हणाला, ‘असा एक अर्थपूर्ण श्लोक बनवा की ज्यात ‘ठाठं ठठं ठं, ठठठं ठठं ठम’ ही ध्वनीवाचक अक्षरंची ओळ चपलखपणे बसेल.’

इतर सर्वांनी मेंदू शिणवले, पण कुणालाच ती समस्या पूर्ण करणे जमेना, तेव्हा महान प्रतिभासंपन्न कवी कालिदास उभा राहिला व म्हणाला –

श्लोक
भोजस्य भार्या मदविव्हला या
कराच्च्युतं चंदनहेमपात्रम ।
सोपानमार्गे प्रकरोति शब्दम ।
ठाठं ठठं ठं ठठठं ठठं ठम ॥

अभिप्रेत अर्थ – कामविव्हल झालेली भोजराजाची पत्नी चंदनलेपाने भरलेले भांडे घेऊन जिन्याच्या मार्गाने जात असता, तिच्या हातातील भांडे पडले व जिन्यातून गडगडत खाली जाताना त्यानी ‘ठाठं ठठं ठं ठठठं ठठं ठम’ असा आवाज केला.)

कालिदासाने केलेल्या समस्यापूर्तीमुळे राजसभेप्रमाणेच भोजराजाही थक्क झाला आणि त्याने त्याला एक हजार सुवर्ण मोहरा देऊन, त्याच गौरव केला.