संपातला कचरा असला संपवला

मुंबई शहरातले झाडून सारे झाडूवाले संपावर गेले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचरा पेटीत घरातला कचरा टाकता येईना.

अखेर गावदेवी विभागात रहाणाऱ्या गणपतराव गावकरांनी एक अजब शक्कल शोधून काढली. दररोजचा घरातला सर्व कचरा एका जाड तपकिरी कागदात अत्यंत आकर्षक रितीने गुंडाळून, ते पुडके ते आपल्या मोटारीच्या पुढल्या सिटवर ठेवीत आणि लगतची खिडकी मुद्दाम उघडी ठेवून, ते दररोज त्या मोटारीतून कुठल्यातरी वेगवेगळ्या दुकानात खरेदीसाठी जात.

दुकानातून जेव्हा ते रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या आपल्या मोटारीकडे परत येत, तेव्ह पुढल्या सिटवर ठेवलेले ते आकर्षक पुडके हमखास कुणीतरी पळवून नेल्याचे आढळून येई. अशा तऱ्हेनं झाडूवाल्यांचा संप असेपर्यंत घरातला कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न गणपतरावांनी आपल्यापुरता तरी सोडवून टाकला !