सण-समारंभ

निसर्गाशी साधर्म्य राखत सुरू झालेली वर्षप्रतिपदा हा आमचा वर्षारंभ. दुर्दैवाने हा संस्कार, ही जाणीव आज आपल्या घरांतून निर्माण होत नाही. १ जानेवारीलाच – खरं म्हणजे ३१ डिसेंबरलाच जल्लोष होत असतो. वास्तविक, आपले जे आहे त्यासंबंधी अधिक आस्था असावयास पाहिजे. तसे संस्कार घरोघरी झाले पाहिजेत. सण तर आणखी पुष्कळ आहेत. राष्ट्रपुरुष रामाच्या कथेने जागृती निर्माण करणारे रामनवरात्र, ज्या गुरूने जीवन घडवले त्याच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमा, पावसाळा संपत आला, समुद्रावर परत दूरदेशांशी व्यापारी वाहतूक सूरू करता येईल त्यामुळे होणाऱ्या आनंदाने साजरी केली जाणारी नारळी पौर्णिमा, विजिगीषु वृत्तीनिदर्शक विजयादशमी, नरकासुरावर विजय मिळविल्याच्या स्मरणार्थ नरकचतुर्दशी, दानाचे व परस्परस्नेहाचे निदर्शक संक्रमण अन असे कितीतरी सण ! प्रत्येक सण आणि तो साजरा करण्याची पद्धती यामुळे जीवनसंबंधी एक वेगळा भावात्मक दृष्टिकोन निर्माण होत असतो. या सणांच्या मागे राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक व निसर्गाशी नाते जोडणारे असे अनेक संदर्भ आहेत. आजहीसण साजरे होतात. पण त्यामागचा दृष्टीकोन पुढल्या पिढीत संक्रमित करायला पाहिजे हा विचार दुर्लक्षित झाला आहे, असे जाणवते.