शेजारी बेडूक

दोघे बेडूक शेजारी राहात असत; एक तलावात राहात असे व दुसरा तलावाच्या काठी असलेल्या रस्त्यानजीक राहात असे. रस्त्यावरील पाणी आटत चाललेले पाहूनतलावातील बेडकाने आपल्या शेजाऱ्यास विनंती केली की, ‘अरे, तू आता आपली जागा सोडून या तलावात राहण्यास ये. येथे आपण दोघे सुखाने राहू.’ यावर त्याचा शेजारी म्हणाला, ‘ही माझी पुष्कळ दिवसांची जागा मला सोडवत नाही; मी आपला येथेच राहणार. पुढे थोडे दिवस गेले नाहीत तोच रस्त्यावरील बेडूक एका गाडीच्या चाकाखाली सापडला आणि चिरडून मेला.

तात्पर्य:- आळशी लोक मरणसुद्धा पत्करतील, पण उदयोग करावयाचे नाहीत.