शिवाजीची यशोगाथा(शिवाजी लोटन पाटील)

शिवाजी लोटन पाटील

शिवाजी लोटन पाटील

यंदाच्या राष्ट्रीय चित्रपटांवर छाप होती ती मराठी मुद्रांची. चार राष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला ‘धग’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच गाजत असल्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढलेली आहे. गावातल्या घाटावर प्रेतांवर उर्वरित अत्यंसंस्कार आणि सेवा करणार्‍या कुटुंबाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेता शिवाजी लोटन पाटील या हुन्नरी दिग्दर्शकाने केवळ मराठीच नव्हे अमराठी प्रेक्षक, माध्यमं आणि चित्रपट सृष्टी या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘शिवाजी लोटन पाटील’ या नावाला आज एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे. आपल्या ध्येयासाठी जळगाव जिल्ह्यातल्या मांदुर्णे या छोट्याश्या खेड्यातून मायानगरी मुबंईत दाखल झालेल्या शिवाजीचा स्ट्रगल खरोखरीच अंगावर काटा आणणारा आहे. कुठलही आर्थिक आणि शैक्षणिक पाठबळ नसताना केवळ चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारणारा शिवाजी पाटील आज या क्षेत्रात स्ट्रगल करणार्‍या अनेकांसाठी आदर्श ठरला आहे. लहाणपणापासूनच लिहिण्याची, वाचनाची आणि अभिनयाची आवड असणारा शिवाजी गावातील तमाशे आणि लग्नातील गाणी ऎकून गावात, शाळेत छोटी छोटी नाटकं बसवायचा. घरातल्या मंडळींना आदल्या दिवशी तमाशात पाहिलेले प्रसंग हुबेहुब परत करून दाखवायचा.

ध्येयाने पछाडेल्या शिवाजीने मुंबई गाठायची हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. एका छोट्याश्या कंपनीत नोकरी करण्यासाठी शिवाजी मुबंईत दाखल झाला. त्यानंतर शिवाजीने दुधाचा व्यवसाय केला त्यात तोटा झाल्यानंतर प्रसंगी रस्त्यावर कांदे-बटाटे विकून शिवाजीने आपला उदरनिर्वाह चालू ठेवला. एका मित्राच्या मदतीने मालिकेच्या दिग्दर्शकांचा असिस्टंट म्हणून शिवाजीला नोकरी मिळाली आणि इथूनच शिवाजीच्या आयुष्यातील नव्या पर्वाला आरंभ झाला. या काळात शिवाजीने भरपूर वाचन केलं, एडिटींग शिकून घेतलं. शिवाजी सांगतो कि, मला मराठी नीट येत नव्हते. माझी भाषा अहिरणी असल्यामूळे मराठी केवळ शाळेपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे मराठी सुधारण्यावर भर दिला.

एकीकडे व्यावसायिक स्ट्रगल चालू असतानाच शिवाजीच्या व्यक्तीगत आयुष्यात ही चढ उतार होत होते.

२०१० साली ‘वावटळ’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून शिवाजीला काम मिळालं. वावटळच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी शिवाजीच्या वडिलांचे निधन झाले. शिवाजीला अंत्यविधीलाही जाता आलं नाही. शूटिंग दरम्यान शिवाजीच्या पत्नीला कॅन्सर असल्याचं निदान झालं आणि चित्रपटाच्या प्रिमीयरच्या दिवशीच पत्नीचं निधन झालं. पण या संघर्षाने शिवाजी कधीच डगमला नाही. ‘नाही जमलं तर नाही ही काय आपल्या बापाची लाईन हाय काय’ या अस्सल रांगडी आत्मविश्वासानेच धग ची राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटली. साधं सरळ व्यक्तीमत्व आणि भाषेतला ग्रामीण लहेजा या शिवाजीच्या वैशिष्ट्यामुळे सामान्य माणसांना तो आपल्यातलाच एक वाटतो.

या हुन्नरी दिग्दर्शकांबरोबर साधलेला संवाद इथे आम्ही मराठीमातीच्या वाचकांसाठी देत आहोत

पहिला प्रश्न अगदीच कॉमन आहे पण विचारावासा वाटतोय, पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वाटतयं?

शिवाजी पाटील : नक्कीच आनंद वाटतोय पण त्याहीपेक्षा ही न्युज मिळल्यानंतर कितीतरी वेळ विश्वासच बसत नव्हता. ही न्युज मिळाली तेव्हा मी पुण्यात होतो. मित्राने फोनवर जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचं सांगितलं तेव्हा रस्त्यावरच चारपाच उड्या मारल्या. गाव ते मुबंई असा सगळा प्रवास डोळ्यासमोर आला.

‘धग’ ची कथा कशी सूचली?

शिवाजी पाटील : मी डोंबविलीत असताना माझ्या शेजारी राहणार्‍या गृह्स्थांचं निधन झालं होतं त्यांच्या अंत्यविधीच्या तयारीत मी मदत करत होतो. स्मशानात गेल्यानंतर तिथे एक कुटुंब दिसलं. हे कुटुंब प्रेताचा उरलेला सोपस्कार करायचे, त्यांच्याकडे लहान मुले ही होती. या लहान मुलांनाच पाहूनच कथा सूचली. कोणी मेलं तरी रात्र भर झोप लागत नाही. लहानपणी तर कोणाची प्रेत यात्रा पाहिली तरी रात्री घाबरून आईच्या कुशीत शिरायचो पण या मुलांवर प्रेत जळत असताना कसलाच परिणाम जाणवला नाही उलट ती खेळत होती.

‘धग’ मध्ये ग्रामीण जीवनशैली दाखवण्यात आली आहे.

शिवाजी पाटील : चित्रपटांमध्ये बजेट हा मुद्दा असतोच. त्याच दृष्टीकोनातून माझ्याच गावात सेट उभारायचा ठरला. त्यामूळे कथा ही ग्रामीण भागातलीच दाखवण्यात आली आहे. माझचं गाव असल्याने सगळ्या गोष्टी करणं सोप्या झाल्या.

चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक होतय. हे सगळं कसं जुळवलं?

शिवाजी पाटील : उपेंद्रला कथा ऎकवली त्याला आवडली आणि उषा जाधव मला भूमिकेसाठी योग्य वाटली पण या चित्रपटाच्या खर्‍या नायकासाठी मात्र मला १०० ते १५० ऑडिशन्स घ्यावा लागल्या शेवटी बीड च्या माझ्या असिस्टंटनी तिकडुन हंसराज जगताप या मुलाला बोलावलं, त्याच्या ऑडिशन नंतर तो मला योग्य वाटला. मग आम्ही त्याला १५ -२० दिवसांचं ट्रेनिंग दिलं. उपेंद्रला त्याच्याबरोबर मैत्री करायला लावली कारण हे सगळं त्याच्यासाठी सगळं नविन होतं.

चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान घडलेले काही किस्से.

शिवाजी पाटील : किस्से तसे भरपूर आहेत. एके दिवशी शूटिंग पहाटे ४.३० पर्यंत चालू होतं आणि त्या शॉट मध्ये हंसराज ही होता. सीन सुरू होतो आणि काही वेळाने हंसराजवर कॅमेरा आला की, हंसराज झोपलेला असायचा. या सीनचे कितीतरी टेक झाले. प्रत्येक वेळेला कॉमेरा त्याच्यावर आला की तो झोपलेला असायचा मग त्याच्या तोंडावर पाणी मारुन त्याला उठवायला लागायचे. चित्रपटात हंसराजचा टक्कल केल्याचा सीन आहे पण जेव्हा त्याची टक्कल करायची वेळ आली तेव्हा तो खूप रडत होता. केस कापतानाही त्यांनी बराच गोंधळ घातला.

या क्षेत्रातलं कूठलही व्यासायिक प्रशिक्षण तू घेतलेलं नाही. तुला कधी अशा प्रकारच्या प्रक्षिणाची गरज वाटली का?

शिवाजी पाटील : नाही, मी मूळात १२ वी पास आहे पण थिअरी करण्यापेक्षा प्रॅक्टिलवर भर दिला. चांगल्या साहित्याचं वाचन केलं. माझी भाषा अहिराणी असल्यामूळे मला मराठी शिकण्यासाठी विषेश प्रयत्न घ्यावे लागले. जे वाचनाने सहज साध्य झालं.

मुंबईत स्ट्रगल करताना कधी तरी कटांळून परत गावी जावसं वाटलं का?

शिवाजी पाटील : नाही कारण मी कधीच दडपणाखाली नव्ह्तो. च्यायला हे माझ्या बापाची लाईन हाय का जमलं जमलं नाही तर दिलं सोडून. पण अनेक मुलं पाहिलीत जी फ्रस्टेट होऊन परत गेली आहेत.

ग्रामीण भागातून या इडंस्ट्रीत येणार्‍या तरूणांना तू काय सल्ला देशील?

शिवाजी पाटील : आपली आवड जोपासा आणि १००% मेहनत करा.

मराठी सिनेमे आशयघन होऊ लागले आहेत, दर्जा ही सूधारला आहे तरीपण काही कमतरता वाटते का?

शिवाजी पाटील : आज अभिमान वाटतो मराठी सिनेमा पाहल्यानंतर. कॉन्सेप्ट वाईज खूपच जबरदस्त असतात. पण आजही मराठी चित्रपटांचं मार्केटींग कमी पडतंय.

2 thoughts on “शिवाजीची यशोगाथा(शिवाजी लोटन पाटील)

Comments are closed.