शिवसेनेचा प्रणवदांना पाठिंबा

प्रणवदा आणि बाळ ठाकरे

प्रणवदा आणि बाळ ठाकरे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले की प्रणव मुखर्जी हेच राष्ट्रपती पदासाठी योग्य उमेदवार आहेत व त्यांनी प्रणवदांना पाठिंबा दिला आहे. एक निवेदन प्रसिद्ध करुन बाळासाहेबांनी प्रणवदांना पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.

शिवसेनाप्रमुख म्हणाले की, राष्ट्रपतिपदाची निवडणूक देशात बरीच गाजत आहे. कुणाचं पितळ तर कुणाचं तांब उघडं पडत आहे. ह्या अवाढव्य देशात या पदासाठी चाललेला खेळखंडोबा अशोभनिय आहे. प्रणवदा यांनाच पाठिंबा देण्याचे बाळासाहेबांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. शिवसेनेने स्पष्ट केले आहे की राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीत एनडीएचा निर्णय जाहीर होण्याआधीच यूपीए उमेदवाराला शिवसेना साथ देत आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीत यूपीएच्या उमेदवार म्हणून प्रतिभाताई पाटील उभ्या होत्या. त्यावेळेस बाळासाहेबांनी मराठी माणसाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली व एनडीएच्या विरोधात जाऊन प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता.

यावेळेस ही निवडणूक लढवण्यात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी नकार दिल्यामुळे आता एनडीएपुढे कोणाला उमेदवारी द्यावी असा प्रश्न पडला होता. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शेवटचा प्रयत्न होणार होता पण त्याआधीच शिवसेनेने प्रणवदा यांना साथ देत असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तृणमूल कॉंग्रेस वगळून यूपीएतील सर्व घटक पक्ष तसेच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या दोन पक्षांनी मुखर्जी यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. डाव्या पक्षांचा पाठिंबा नसल्याचा मुखर्जी यांच्या उमेदवारीच्या स्वागतावर कुठलाच परिणाम झाला नाही. शिवसेनाप्रमुखांनी आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे प्रणवदांसाठी ही निवडणूक सोपी झाली आहे.