श्रेष्ठ कोण ? दैव की कर्तृत्व

‘श्रेष्ठ कोण ? दैव की कर्तृत्व ?’ असा प्रश्न एकदा अकबर बादशहानं दरबारात विचारला असता, एक बिरबल वगळता बाकी सर्वांनी ‘दैव’ असं उत्तर दिलं. परंतू बिरबल म्हणाला, ‘खाविंद, कर्तृत्व हे बऱ्याच वेळा दैवाला बदलू शकत असल्याने, तेच दैवापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.’ बिरबलाचं हे उत्तर ऎकून बादशहा त्या वेळी गप्प बसला, पण त्याने या बाबतीत बिरबलाची परिक्षा घ्यायचं ठरविलं.

बिरबलानं हे उत्तर दिलं, त्याच्या दुसऱ्याच दिवशीची गोष्ट. तो नित्याप्रमाणे यमुनेवर स्नानाला जाण्याचा जवळचा मार्ग म्हणून एक चिंचोळ्या गल्लीतून जात होता. तो त्या गल्लीच्या मध्याला गेला आणि बादशहाच्या सूचनेनुसार एका माहुतानं एका पिसाळलेल्या हत्तीला जोरानं अंकुश मारुन, त्याच गल्लीच्या समोरच्या बाजूनं आत पिटाळले.

एक मदोन्मत्त व पिसाळलेला हत्ती समोरुन धावत येत असून, आपल्याला जर निसटून जायला मार्गच राहिलेला नाही ही गोष्ट लक्षात येताच, बिरबलानं जवळून आत असलेल्या एका कुत्र्याला पटकन उचलून, त्या हत्तीच्या मस्तकावर फ़ेकून दिलं.

हत्तीच्या गंडस्थळावर पडताच, तिथून खाली पडू नये म्हणून त्या कुत्र्यानं त्याच्या गंडस्थळात आपल्या नख्या रोवून त्याला घट्ट पकडून ठेवलं. त्या नख्या खुपु लागताच, तो हत्ती भयभीत होऊन मागे फ़िरला व धावत चित्कारत आल्या वाटेनं परत राजवाड्यावर गेला.

दुर्दैवानं पाठवून दिलेल्या मृत्यूला बिरबलानं केवळ आपल्या बुध्दी व कर्तृत्व यांच्या जोरावर परत फ़िरवल्याचं पाहून अकबरानं ‘ दैवपेक्षा कर्तृत्व श्रेष्ठ’ हे बिरबलाचं म्हणणं मान्य केलं.