श्रीकृष्णाची आरती अवतार गोकुळीं हो

अवतार गोकुळीं हो, जन तारावयासी ।
लावण्यरूपडें हो, तेजःपुंजाळ राशी ॥
उगवले कोटीबिंब, रवि लोपला शशी ।
उत्साह सुरवरां, महाथोर मानसीं ॥ १ ॥
जय देवा कृष्णनाथा, राई रखुमाईकांता ।
आरती ओंवाळीन, तुम्हां देवकीसुता ॥ ध्रु० ॥
कौतुक पहावया, माव ब्रह्मयानें केली ।
वत्सेंही चोरुनियां, सत्य लोकासी नेलीं ॥
गोपाळ, गाई, वत्सें दोहीं ठायीं रक्षिलीं ।
सुखाचा प्रेमसिंधू, अनाथांची माउली ॥ जय० ॥ २ ॥
चारितां गोधलें हो, इंद्र कोपला भारी ।
मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारीं ॥
रक्षिलें गोकुळ हो, नखीं धरिला गिरी ।
निर्भय लोकपाळ, अवतरले हरी ॥ जय० ॥ ३ ॥
वसुदेव देवकीची, बंद फोडिली शाळ ।
होऊनियां विश्वजनिता, तयां पोटिंचा बाळ ॥
दैत्य हे त्रासियेले, समूळ कंसासी काळ ।
राज्य दे उग्रसेना, केला मथुरापाळ ॥ जय० ॥ ४ ॥
तारिले भक्तजन, दैत्य सर्व निर्दाळून ।
पांडवां सहकारं अडलिया निर्वाणीं ।
गुण मी काय वर्णूं, मति केवढी वानूं ।
विनवितो दास तुका, ठाव मागे चरणीं ॥ जय ० ॥ ५ ॥