श्रीविष्णूची आरती नारायण खगवाहन

नारायण खगवाहन चतुराननताता ।
स्मर‍अरितापविमोचन पयनिधिजामाता ॥
वैकुंठाधिपते तव महिमा मुखिं गातां ।
सहस्त्र मुखांचा तोही थकला अनंता ॥ १ ॥
जय देव जय देव जय लक्ष्मीकांता ।
मंगल आरति करितों भावें सुजनहिता ॥ ध्रु० ॥
सदैव लालन पालन विश्वाचें करिसी ।
दासांस्तव तूं नाना अवतार धरिसी ॥
दुष्टां मर्दुनि दुःखा भक्तांच्या हरिसी ।
निशिदिनीं षण्मुखतातातें हृदयीं स्मरसी ॥ जय० ॥ २ ॥
चपला सहस्त्र जयाच्या जडल्या वसनासीं ।
कोटिशशि क्षयविरहित शोभति वदनासी ॥
कौस्तुभमुगुटविराजित मूर्ती अविनाशी ।
ज्यातें हृदयीं ध्यातां भवभय अघ नाशी ॥ जय० ॥ ३ ॥
तारीं वारीं संकट मारी षड्रिपुला ।
स्मरती त्यांतें देइं संपत्ती विपुला ॥
तापत्रय जाळितसे निशिदिनिं मम वपुला ।
दास म्हणे वोसंगा घे बालक आपुला ॥ जय० ॥ ४ ॥