श्रीविठ्ठलाची आरती युगें अठ्ठावीस

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ ध्रु० ॥
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।
कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढें उभे रहाती ॥ जय० ॥ २ ॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळें वनमाळा गळां ॥
राई-रखुमाबाई राणीया सकळां ।
ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय० ॥ ३ ॥
ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥ जय० ॥ ४ ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ॥ जय० ॥ ५ ॥