सिद्धीविनायक सिद्धटेक

सिद्धीविनायक सिद्धटेक

सिद्धीविनायक सिद्धटेक

सिद्धटेक स्थितो भीमातीरे जगदवनकामेन हरिणा ।
विजेतु दैत्यो तच्छुति मलभवौ कैटभमधू ॥
महाविघ्नार्तेन प्रखर तप्सा सेवितपदो ।
गणेश सिद्धीशो गिरीवरवपुः पंचजनक ॥१॥

अर्थः –

भयंकर संकटात सापडलेल्या श्रीहरीविष्णूने भीमारीरावरील हिरव्यागार वृक्षांच्या राईत असलेल्या पर्वतश्रेष्ठ सिद्धटेक पर्वतावर कडक तपश्चर्या करून, पंचमहाभूतांचाही जनक असलेल्या अशा सिद्धेश्वर गणेशाकडून वर मिळवला आणि मधू व कैटभ या दोन दैत्यांना यमसदनी पाठवले अशा सिद्धेश्वराच्या चरणी माझी सेवा रूजू असू दे.

कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धीविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. श्रीविष्णूला येथे सिद्धी प्राप्त झाली अशी पौराणिक कथा आहे. हे अत्यंत कडक व जागृत सिद्धीस्थान आहे. चिंचवडच्या मोरया गोसावींना आणि केडगावच्या नारायण महाराजांना येथेच सिद्धी प्राप्त झाली.
पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांना आपले गमावलेले सेनापतीपद सिद्धीविनायकाची २१ दिवस उपासना करून परत मिळाले.

श्रीक्षेत्र सिद्धटेकचे भौगोलिक स्थान व मार्ग :-

भीमा तीरावर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील व कर्जत तालुक्यातील सिद्धटेक हे शहरीकरणाचा स्पर्श न झालेले उत्कृष्ट खेडेगाव आहे. ऊसाची, गव्हाची विस्तीर्ण शेती चारी बाजूंनी आहे. मातीच्या भिंती आणि गवतांची शाकारलेली छोटी छोटी घरे इथली विशेषता आहे. गुरांचे व मेंढ्याचे कळप इथला कुरणांवर चरताना आढळतात. सिद्धटेकला जाण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग खालील प्रमाणे – सिद्धटेकला जाण्यासाठी पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरील सोयीचे रेल्वेस्टेशन आहे. दौंड ७८ कि.मी. वर आहे. (दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८कि.मी. आहे., दौंड पुण्याहून हडपसर -लोणी – यवत – चौफुला -पाटसमार्गे दौंड ७८ कि.मी. आहे. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. पूर्वी सिद्धटेकला जाण्यासाठी भीमा नदी पार करावी लागत होती. आता नदीवर पूल झाल्यामुळे वाहने थेट मंदिरापाशी थांबतात.