येरवडा जेलमध्ये सिद्दीकी याचा खून

येरवडा जेल पुणे

येरवडा जेल पुणे

जर्मन बेकरी स्फोटाच्या वेळेस पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा दहशतवादी मोहम्मद कातिल मोहम्मद जाफर सिद्दीकी उर्फ सज्जन उर्फ साजन उर्फ शहजादा सलीम (वय २७, रा बिहार) याचा सर्वांत सुरक्षित समजल्या जाणार्‍या येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये शुक्रवारी सकाळी खून करण्यात आला. शरद मोहोळ आणि आलोक भालेराव या पुण्यातील गुंडांनी नाडीच्या साह्याने सिद्दीकीचा गळा आवळून त्याला मारले. इंडियन मुजाहिदीन संघटनेचा सिद्दीकी कुख्यात दहशतवादी होता. त्या गुंडांनी त्याला का मारले, हे अजून स्पष्ट स्मजलेले नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येरवड्याचे जेलर एस. व्ही. खटावकर यांना निलंबित करण्याचे व या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सहा दहशतवाद्यांसमवेत दिल्ली पोलिसांनी सिद्दीकीला अटक केली होती. १३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्याच्या जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता. सिद्दीकी याने पोलिसांकडे खुलासा केला होता की, त्याच दिवशी सायंकाळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ सुद्धा बॉम्ब लावण्याचा त्याने प्रयत्न केला होता.

येरवडा जेलमधल्या अंडा सेलमध्ये सिद्दीकीला गेल्या दहा दिवसांपासून ठेवण्यात आले होते. शरद मोहोळ आणि आलोक भालेराव या पुण्याच्या खंडणीखोरांनाही तेथेच ठेवण्यात आले होते. आलोक आणि शरदबरोबर सिद्दीकीचे भांडण झाले होते. त्या दोघांनी या भांडणाचा राग धरून त्याच्या खूनाचा कट रचला होता. शरदकडे बर्मुडा पँट होती व खून करण्यासाठी त्याने त्या पँटच्या नाडीचा वापर करण्याचे ठरवले होते.

अंडा सेलमधील बराकींचे दरवाजे नेहमीप्रमाणे सकाळी सहाच्या सुमारास उघडण्यात आले होते. सकाळी नऊच्या सुमारास शरद त्याच्या बराकीमधून आलोकच्या बराकीमध्ये अंडा सेलमधील वर्दळ कमी झाल्यानंतर गेला. ते दोघेही नंतर सोद्दीकीच्या बराकीमध्ये घुसले आणि त्या नाडीच्या साह्याने गळा आवळून त्यांनी सिद्दीकीचा खून केला. सिद्दीकी काही मिनिटांमध्येच मरण पावला. काही झालेच नाही, असा आव आणता आलोक आणि शरद आपापल्या बराकीत परतले.

हे प्रकरण तेथे असलेल्या गार्डच्या लक्षात आले. सिद्दीकीचा खून झाल्याचे समजल्यावर सगळ्यांच्याच तोंडाचे पाणी पळाले. सीआयडी आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. जेलमध्ये गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विनोद सातव, पोलिस निरिक्षक सतीश गोवेकर, बापू कुतवळ, सुनील पाटील, किशोर जाधव आदींनी लगेच धाव घेतली. या घटनेची माहिती आलोक आणि शरदने कोणालाच दिली नव्हती पण पोलिस अधिकार्‍यांना पाहिल्यावर त्यांचे धाबे दणाणले.