सिंह आणि बोकड

एका सिंहाने, एका तुटलेल्या कडयाच्या माथ्यावर एका बोकडास चरताना पाहिले. मग तो त्यास म्हणाला, ‘अरे, तू इतक्या उंचावर जाऊन आपला जीव विनाकारण धोक्यात घालीत आहेस, यापेक्षा मी उभा आहे, त्या ठिकाणी येशील तर येथील हिरव्यागार गवतावर तुझे पोट सहज भरेल.’ सिंहाचे कपट जाणून, बोकड त्यास उत्तर करतो, ‘ सिंह दादा, आपल्या सुचनेबद्दल मी आपला आभारी आहे, परंतु आपण माझ्या पोटाची काळजी करीत आहात, की माझ्या मांसाने स्वतःचे पोट भरण्याच्या विचारत आहात, यासंबंधाने मला थोडा संशय वाटतो.’

तात्पर्य:- शत्रूने कितीही हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी शहाण्या मनुष्याने त्याचा विश्वास धरू नये.