सिंह आणि हत्ती

एका सिंहास असे वाटले की, आपल्यासारख्या पराक्रमी आणि शक्तिमान्‌ प्राण्याला यःकश्चित्‌ कोंबडयाचा आवाज ऐकताच भय वाटावे, ही मोठया लज्जेची आणि दुःखाची गोष्ट होय. कोंबडयासारख्या हलकट प्राण्याच्या शब्दास भिण्यापेक्षां मृत्यू आलेला काय वाईट ? अशा प्रकारचा विचार मनांत येऊन तो फार दुःख करीत आहे, इतक्यांत एक मोठा हत्ती कान हलवीत तिकडून आला. त्याच्या चर्येवरून त्यास कांही तरी दुःख होत असावे, असे दिसले. मग सिंह त्यास विचारतो, ‘दादा, तुम्हांस कोणते दुःख होत आहे ? तुमच्यासारख्या शक्तिमान प्राण्याला दुःख देण्यास, या जगांतला कोणता प्राणी समर्थ आहे ?’ हत्ती उत्तर करितो, ‘गडया, हे सारखे गुणगुणत राहणारे चिलट तू पाहिलेस काय ? हा क्षुद्र पाणी माझ्या कानांत शिरून मला दंश करू लागला, म्हणजे मला जे दुःख होते, त्याचे वर्णन करवत नाही.’ हे ऐकताच, सगळ्याच प्राण्यांच्या मागे कांही ना कांही तरी दुःख लागलेच आहे असे समजून सिंहाने आपल्या मनाचे समाधान करून घेतले ?’

तात्पर्य:- ‘जगीं सर्व सुखी असा कोण आहे?’