स्पर्श न करता रेषा लहान कर

एके दिवशी बादशहा अकबर हा बिरबल व इतर काही दरबारी मंडळी यांच्यासह संध्याकाळच्या वेळी यमुनेच्या काठी फ़िरायला गेला असता, त्याने हातातल्या काठीनं यमुनाकाठच्या स्वच्छ व सफ़ाईदार वाळवंटात एक रेषा काढली. नंतर आपल्या बरोबर असलेल्या मंडळींना उद्देशून तो म्हणाला, ‘या रेषेला कुठल्याही तऱ्हेने स्पर्श न करता, तुमच्यापैकी कुणी हिला लहान करु शकेल का ?’

बिरबलाखेरीज सर्वजण म्हणाले, ‘खाविंद, हे कसं काय शक्य आहे ?’

‘का शक्य नाही ?’ असं म्हणून, बादशहानं काढलेल्या रेषेच्याच बाजूला बिरबलानं आपल्या हातातल्या काठीनं समांतर अशी मूळच्या रेषेपेक्षाही बरीच मोठी रेषा काढली. नंतर त्या रेषेकडे बादशहाचं लक्ष वेधवून बिरबल म्हणाला, ‘खाविंद, मी काढलेल्या मोठ्या रेषेपुढं आपण काढलेली रेषा एकदम लहान झाली की नाही? पुन्हा आपल्या अटीनुसार आपल्या रेषेला कुठल्याही तऱ्हेने स्पर्श न करता !’
बिरबलानं लढवलेल्या या युक्तीवर बादशहा बेहद्द खुश झाला.