आदर्श प्रकरणी सुभाष लालांनी दिला राजीनामा

Subhash Lala

सुभाष लाला

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाचे सदस्य सुभाष लाला यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माहिती आयुक्त रामानंद तिवारी देखिल आदर्श प्रकरणी राजीनामा देण्याची शक्यता आहे.

शहिदांच्या कुटुंबियांसाठी राखीव असलेल्या जागा लाटून निवडक राजकारणी तसेच प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी यांनी स्वार्थ साधल्याचे उघड झाले आहे. रामानंद तिवारी नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आणि सुभाष लाला हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव असताना त्यांनी आदर्श सोसायटीला मंजुरी देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना आदर्शमध्ये फ्लॅट देण्यात आले. यामुळे आदर्श घोटाळ्यात तिवारी आणि लाला यांचे नाव घेतले जात आहे. दोघेही घटनात्मक पदावर असल्याने त्यांनी स्वत:हून पदांचा राजीनामा द्यावा, असे राज्य सरकारने सांगितले होते. परंतु त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.

माहिती आयुक्त आणि राज्य मानवी आयोगाचे सदस्य ही दोन्ही घटनात्मक पदे असल्याने त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशावरुन मुख्य सचिव जे. पी. डांगे यांनी लाला आणि तिवारी यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. पण दोन्ही अधिका-यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने राज्य सरकारने राष्ट्रपती आणि राज्यपालांमार्फत अधिका-यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर लाला यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, सीबीआयने आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात काही बड्या प्रशासकीय आणि लष्करी अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कारवाई लवकरच सुरू करणार असल्याचे संकेत दिले आहेत.