सुंदर माझे घर

केवळ चार भिंती आणि छप्पर म्हणजे घर नव्हे. ह्या चार भिंतीत राहणारी माणसं . तिथं असणारं सामान, त्यात असणारं वातावरण आणि त्यातून निर्माण होणारा आंनद, प्रेम, सुख म्हणजे घर आपले घर सुंदर असावे असे प्रत्येकालाच वाटते. जागेची टंचाई वाढती महागाई यामुळे मनासारख्या वस्तू खरेदी करणे, वापरणे काही वेळा अशक्य असते. जे आपल्याकडे आहे त्यांचा वापर डोळसपणाने करून आपले तर अधिक चांगले कसे दिसेल याचा विचार करणे वरील कारणामुळेच आवश्यक ठरते. नुसत्या किंमती, महागड्या वस्तूंचा संग्रह केला म्हणजेच घर सुंदर दिसेल असे नाही. म्हणून सुंदर म्हणजे नेकमे कसे हे समजून घेतले पाहिजे. स्वच्छता हा सौंदर्याचा आत्मा आहे. याशिवाय टापटीप आणि व्यवस्थितपणा हवा तरच घर सुंदर दिसेल. स्वच्छता आणि टापटीप ठेवण्यासाठी काय करता येईल. यासंबंधीचा विचार थोडक्यात पुढे दिला आहे.

स्वच्छता म्हणजेच सौंदर्य :
अस्वच्छता सौंदर्याचा ग्रहण लागते. कोणतीच अस्वच्छ गोष्ट डोळ्याला सुख देत नाही तेलकटपणा, चिकटपणा, इतर डाग, धूळ यामुळे वस्तू खराब दिसतात. ही अस्वच्छता आपल्या आरोग्याला घातक असते. शिवाय त्यामुळे वस्तूचा टिकाऊपणाही कमी होतो. विशेषतः लोखंडी सामान, लाकडी फर्निचर, कापडी वस्तू यांची याबाबत दक्षता घ्यायला हवी. पुस्तकेही वेळच्यावेळी लक्ष न दिल्यास वाळवी लागून फुकट जातात. रोजच्या वापरातले डबे, डबे ठेवायच्या फळ्या, दुभत्त्याचे कपाट, लाकडी फर्निचर, दाराच्या मुठीजवळचे भाग, टेलिफोन, टिपॉय, चित्रांच्या फ्रेम अशा वस्तू मऊ कापडाने, हलक्या हाताने उंच, बाजूकडून जमिनीकडे अशा क्रमाने पुसत यावे. धूळ झटकू नये. कारण त्यामुळे ती एका वस्तूवरून उडून दुसऱ्या वस्तूवर बसते.

वळचणीच्या जागा म्हणजे सोफा, कपाटे, चित्रांच्या फ्रेम, दिवाण यासारख्या वस्तूंच्या मागून आठवड्यातून एकदातरी स्वच्छता फिरावी, छताचे कोपरे बघून जाळ्या जळमटे काढावी. मासिक स्वच्छतेमध्ये महिन्याचे सामान भरण्यापूर्वी तेलाची भांडी, धान्याचे डबे स्वच्छ करावे. पंखे स्वच्छ करणे, कपाटामधील कागद बदलणे रद्दीची विक्री यासारखी कामे वेळच्यावेळी लक्ष देऊन केल्यास घर स्वच्छ ठेवणे सोपे जाते.
खाद्यपदार्थ पडण्याच्या जागा रोजच्यारोज लगेच स्वच्छ कराव्या अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावे. डबे-बाटल्या यांना घट्ट झाकणे असावी यामुळे कीटक, उंदीर यांना आपोआपच पायबंद बसतो. विशेषतः झुरळे, मुंग्या अन्नाच्या लहान सहान कणांवरच आपली उपजीविका करतात. म्हणून स्वच्छतेबरोबरच अन्नपदार्थांची नीट काळजी घेतल्यास त्यांचे प्रमाण राहाण्यास मदत होते. सौंदर्यात स्वच्छतेचे महत्त्व आहेत, पण स्वच्छता ठेवणे सोपे जावे म्हणूनही काही गोष्टींचा विचार करायला हवा.

अनावश्यक सामान :
टॉनिकच्या बाटल्या, औषधांच्या बाटल्या, खोकी, लहानमोठे टिनचे डबे, कागदाच्या पिशव्या, जुने जीर्ण कपडे, विजोड वस्तू उदा. डबा चांगला आहे, झाकण मोदके आहे कधीतरी उपयोग होईल म्हणून अशा वस्तू घरात साठवतात. त्यांच्यामुळे घाण वाढतच जाते. कित्येकवेळा काही डबे, बाटल्या वर्षात उघडून पहाणेही जमत नाही आणि त्यातील वस्तू वाया जातात. खेड्यातील गृहिणींना ऐनवेळी मिळणार नाही म्हणून काही वस्तूंचा साठा करणे अपरिहार्य असते. परंतु शहरात जवळपासच्या दुकानांमध्ये हवा तो माल मिळतो म्हणून स्वच्छता ठेवणे आपल्या आटोक्याबाहेर जाईल ऐवढे सामान घरात जमवू नये. साधारण तारतम्याने अनावश्यक वाटणाऱ्या गोष्टी वेळच्यावेळी घरातून काढून टाकाव्या.

योग्य साधन साहित्याची निवड
वस्तू घेताना चांगली दिसली तरी ती तशीच चांगली दिसावी म्हणून नंतर कितपत काळजी घ्यावी लागते याचा विचार खरेदीच्या वेळीच करणे आवश्यक आहे. जी साधने स्वच्छ ठेवण्यास जोपी आहेत अशांची निवड करावी. उदा. पितळी बादल्या, घंगाळ, पाण्याची भांडी, डबे ही अवजड असतात व लवकर डागाळतात. म्हणून त्याऐवजी शक्य असेल तेथे स्टील, हिंदालियम, अल्युमिनियम, प्लॅस्टिक यांचा वापर करावा. साध्या साबणाने किंवा पावडरने घासून ही भांडी स्वच्छ राहतात. लवकर डागळत नाहीत. त्यामुळे स्वच्छता ठेवणे सोपे जाते. याशिवाय घरातील लाकडी फळ्यांना शक्यतो ऑईलपेंट लावावा. त्यामुळे फळ्य स्वच्छ ठेवणे सोपे जाते. फळ्या सलग असाव्या म्हणजे झुरळे होत नाहीत. जोडाच्या असल्यास त्यात लांबी भरून झुरळे न होण्याची काळजी घ्यावी. भिंतीमधील कपातात विशेषतः स्वैंपाकघरात कडाप्पा बसवावा. त्यामुळे कपाटे धुवुन स्वच्छ ठेवणे सोपे जाते.

टेबले, कपाटांचे दर्शनी भाग, रेडिओ, टी.व्ही. यांच्या केसेस यांना सनमायका लावावा. ते शक्य नसेल तर रेक्झीन किंवा प्लॅस्टिकचे आच्छादन घालावे. किंवा कापडी आच्छादने घालावी. ओटा, खोलीतील फरश्या, मोरी यांना योग्य उतार असावा. त्यामुळे धुण्याचे काम सोपे होत व स्वच्छता ठेवणे सोईचे जाते. सर्वच खोल्यामध्ये भिंतीच्या तळाशी, जमिनीलगत ६” उंचीपर्यंत फरशी बसवून घ्यावी. स्वैंपाकघरात याची उंची थोडी अधिक असावी. कारण ती फरशी आपल्याला जास्तवेळा पुसावी लागते. ही काळजी घेतल्यामुळे भिंतीवर धुण्याच्या पाण्याचे डाग पडत नाहीत व भिंती स्वच्छ राहण्यास मदत होते.

सामानाची मांडणी
मांडणीचा विचार घरबांधणीपासूनच करायला हवा. म्हणजे एकमेकांशी संबंधित असलेल्या कृतींची जागा घर बांधतानाच योग्य आणखी करून जवळजवळ ठेवायला हवी. उदा. स्वयंपाक घर आणि जेवण घर, फ्रीजची जागा आणि स्वयंपाकघर, धुणे धुण्याची जागा आणि धुणे वाळत घालण्याची जागा ही शक्य तेवढी जवळजवळ हवी म्हणजे अधिक जा-ये करावी लागत नाही आणि काम अधिक तत्परतेने होते. एखाद्या कृतीसाठी संबंधित सामान जवळजवळ हवे. यामुळे काम सोपे होते व वस्तू जागच्या जागी राहण्यास मदत होते. उदा. इस्त्री ठेवायची जागा, इस्त्री करायची जागा, इस्त्री करायचे कपडे, कपडे ठेवायचे. कपाट हे जवळजवळ हवे. काम करायची जागा आणि वस्तू ठेवायची जागा लांग असल्यास, तसेच वस्तू अवजड असल्यास त्या जागच्या जागी ठेवणे तत्परतेने होत नाही. ह्यामुळे पसारा वाढतो. म्हणूनच प्रत्येक वस्तूला सोयीस्कर जागा हवी आणि काम झाल्यावर वस्तू जागेंवरच ठेवायला हवी. स्वच्छतेइतकेच टापटिपीला आणि व्यवस्थितपणाला महत्त्व आहे. सामान ठेवायची जागाही सोयीची हवी. वरचेवर लागणारे सामान सहज हात पोचेल अशा उंचीवर हवे. हात नीट मागे पोचत नाही एवढी खोल कपाटे किंवा ओट्यांची उभे राहिल्यावर थोडेसे डाव्या उजव्या बाजूला होऊन दोन्ही हाताच्या टप्प्यात येतील अशा तऱ्हेने मांडाव्या.  साल्याचा डबा, किचन टेबल, ताटाळे, कपबशांचे स्टॅंड अशा साधनांमुळे आवश्यक वस्तू एकत्रित मिळणे सोपे जाते. अशा तऱ्हेची विविध साधने बाजारात मिळतात. त्यांचा सोयीप्रमाणे वापर करावा. अशा तऱ्हेने सुटसुटीत मोजक्याच साहित्याची योग्य मांडणी केल्यावर स्वच्छता ठेवणे, टापटीप व व्यवस्थिपणा राखणे सोपे जाते व घर सुंदर दिसते.“माझे घर” यातील माझे शब्द फार महत्त्वाचा आहे. सर्वांची घरे साचेबंद दिसली तर ते आपल्याला आवडणार नाही. आपला ठसा आपल्या घराच्या मांडणीत दिसणे अपरिहार्य आहे. त्यामुळेच वास्तूबद्दल आपलेपणा वाटतो. प्रत्येक कुटुंबाच्या गरजा, व्यक्तीच्या सवयी, आवडी निवडी आणि सुखाविषयीच्या कल्पना भिन्न असतात. त्यांची पूर्ती झाली तरच घरात समाधान व आनंद मिळेल.

रंगसंगती :
घरातील वस्तूंची निवड, रंगसंगती मांडणीतील कलात्मकता, शोभेच्या वस्तूंचे संग्रह यातून कुटुंबातील व्यक्तींच्या आवडी निवडी चोखदळपणा, थोडक्यात त्यांचे व्यक्तीमत्त्व प्रतिबिंबित होते. म्हणून घरातील सर्व वस्तूची पारख काळजीपूर्वक करावी. वस्तूंची निवड, मांडणी आणि वापर यासंबंधी काही उपयुक्त सूचना पुढे दिल्या आहेत. जमिनीचे रंग मंद असावेत. भिंती ह्या खोलीतील सर्व सामानाच्या मांडणीसाठी पार्श्वभूमी म्हणून वापरल्या जातात. म्हणून त्या फिक्या रंगाच्या असाव्या. छत सर्वात फिके असावे. काळोख्या खोलीत पिवळसर किंवा लालसर रंगाच्या छटा तर खूप प्रकाश असणाऱ्या खोलीत निळसर किंवा हिरवट रंगाच्या छटा वापराव्या. सिमेंटच्या नवीन प्रकारच्या फरशांवर खूप गडद ठिपके असतात त्यामुळे कचरा दिसत नाही. शिवाय पाणी पडलेले असल्यास ते न दिसून माणूस पडण्याची भीती असते.
खोलीतील सामानाचे कृतीनुसार विभाग पाडावे. वस्तू वापरताना अडथळा येणार नाही, जाण्यायेण्यास पुरेशी जागा राहील, केर काढणे-पुसणे गैरसोईचे होणार नाही हे लक्षात ठेवून सामानाचे समूह आकर्षक दिसतील असे मांडावे.

एकाच खोलीत विविध रंग आणि विविध छापांची ( डिझाईन ) सजावट वापरू नये. ज्यावर सजावट आहे अशा पुष्पपात्रात रंगीबेरंगी फुले भरून प्रिटेंड टेबलक्लॉथवर ठेवली तर सर्व सजावट एकत्र होऊन ते अनाकर्षक दिसते. म्हणून सुंदर लॅंपशेड पुष्परचना चित्रांच्या फ्रेम यांना पुरेशी मोकळी पार्श्वभूमी ठेवावी. स्वयंपाकाच्या ओट्यालगतच्या भिंतीशी फरशी बसवावी. फोडणीचे वगैरे डाग भिंतीवर पडत नाहीत व धुवून स्वच्छ ठेवणे सोपे जाते. स्वयंपाकघरात सारख्या आकाराच्या बरण्या, बाटल्या, वाट्या, भांडी यांचे समूह नेहमीच मांडले जातात. ते आकर्षक दिसतात. बरण्या, बाटल्या पारदर्शक वापराव्या म्हणजे वस्तू चटकन सापडतात. पुष्ठ्यांवर आकर्षक सजावट करून कोरे कागद आणि पेन्सिल अडकवण्याची सोय करून एखादी नोंदवही ठेवावी. संपलेल्या वस्तू साधनांची दुरुस्ती, निरोप इ. गोष्टी त्यावर सोयीप्रमाणे टिपून ठेवता येतात.

जागेअभावी एकच खोली अनेक , कृतीसाठी वापरली जाते. बहुउद्देशीय ( Multi Purpose ) फर्निचर आणि मांडणीत लवचिकता ठेवून खोलीची मांडणी गरजेप्रमाणे बदलून घ्यावी. दारामागच्या जागा, पोटमाळे, दिवाणाखाली कपाट करणे, कपाटाचे दार डायनिंग टेबलप्रमाणे वापरणे अशा योजना करून जागेचा जास्तीत जास्त वापर करावा. वस्तूवरील कापडी आच्छादने ( टेबलक्लॉथसारखी ) धुतल्यावर स्टार्च इस्त्री करून वापरावी म्हणजे त्यांचा नवेपणा टिकून राहातो. पडद्यांना अस्तर लावावे. घरांतील मोठे सामान वरचेवर बदलता येत नाही. म्हणून नाविन्यासाठी चित्र, पुष्परचना, टांगायच्या कुंड्या, घरात वाढणाऱ्या लहान झाडांच्या कुंड्या व इतर शोभेच्याच वस्तूंचा वापर करावा.
यातील विशेषतः शोकेसमध्ये सर्वच वस्तू एकदम मांडू नयेत. विशिष्ट कल्पनेशी मिळत्या जुळत्या वस्तूंचेच संग्रह मांडावे.

चित्रांच्याबाबतीतही ही दक्षता घ्यावी. मधून मधून ह्या वस्तू बदल्यामुळे घरात नावीन्य टिकून राहाते. लाकडी फर्निचर मधून मधून घरीच  पॉलिश करावे. बाजारात तयार फ्रेंच पॉलिश मिळते. लाकडावरील रेषांच्या दिशेने हे पॉलिश मऊ कापडाने लावावे. एक हात लावल्यावर दुसरा हात द्यावा. लाकडी वस्तूंवर प्रत्यक्ष ऊन येऊ देऊ नये. तसेच पाण्याचे डाग न पडण्याची दक्षता घ्यावी. काचेच्या खिडक्या, कपाटे किंवा टेबल, आरसे स्वच्छ करण्यासाठी पाणी हलक्या हाताने शिंपडून कागदाने पुसून घ्यावे. कोरडे पुसायचे असल्यास मलमल सारखे कापड वापरावे. पाण्याचे ग्लास ओट्यावर चिकटून पालथे न घालता किंचित फट राहील असे कलते घालावे. म्हणजे आतून बाहेरून कोरडे होतात.चार भिंतीचा आडोसा म्हणजे घर नव्हे. त्या घराला घरपण मिळाल पाहिजे तरच घर खऱ्या अर्थानं सुंदर माझे घर होईल.