स्वदेशीभाव

कुटुंबात प्रामुख्याने व्हायला हवे स्वदेशीभावाचे जगरण. ब्रिटिश मालाचा उठाव व्हायला हवा म्हणून इंग्रजांनी आमच्या उद्योगधंद्यावर आघात केले. हातमाग मोडले, कुशल विणकरांचे अंगठे तोडले, देशी औषधांचे उत्पादन थांबवले हा इतिहास माहीत असूनही आज आम्हाला ‘ इंपोर्टेड ’ वस्तूंचे कौतुक वाटते. आमचा स्वाभिमान नष्ट व्हावा म्हणून आमचा इतिहास इंग्रजांनी बदलला. अन आजही आम्ही विकृत इतिहास मुलांना शिकवीत आहोत. इंग्रजांनी इंग्रज भाषा आमच्यावर लादली अन आज आम्ही पहिल्यापासून इंग्रजी शिकवायला सुरुवात केली आहे. मातृभाषेतूनच शिक्षण व्हायला हवे हा शिक्षणशास्त्राचा नियम आम्ही धुडकावून लावला आहे. वस्त्र हे शरीर व लज्जारक्षणाकरिता असते, हे विसरून ‘ फॅशन ’ म्हणून तोकडे कपडे आम्ही घालू लागलो आहोत. शालीन सौंदर्याकडून स्त्री उत्तान देहप्रदर्शनाकडे वळली आहे. अन असेच कितीतरी घडते आहे.

स्वभाषा, भूषा, भोजन, इतिहास, परंपरा, संस्कृती, चालीरीती, वाढदिवस, नूतन वर्षारंभ, भेटपत्रे, स्वतःची स्वाक्षरी, घरांवरच्या नामपट्ट्या, दुकानांवरचे नामफलक , विविध प्रसंगांची निमंत्रण पत्रके, मुलामुलींची नावे, शिष्टाचार ( हस्तांदोलन नको नमस्कार ) हाक मारण्यासाठी वापरायचे संबोधन ( आई, बाबा, काकू, आत्या, मावशी, काका, दादा हवे – मम्मी , पप्पा, ऑंटी, अंकल नसावे ) वगैरे बारीकसारीक गोष्टींतून देशाभिमान व स्वाभिमान जागृती घराघरांतून व्हायला हवी. ‘ व्हॅलेंटाईन डे ’ चे वाढते प्रस्थ व एकतर्फी प्रेमातून स्त्रीच्या जिवाला वाढता धोका लक्षात घ्यायला हवा. या सर्व गोष्टी घरांतूनच निर्माण होतील. लहान मुले संस्कारक्षम असतात. त्याचवेळी त्यांच्या मनात या गोष्टी रुजवायला हव्यात. म्हणजेच स्वदेशीभाव हा स्वभाव बनायला हवा. स्वातंत्र्यसंग्रामात स्वदेशी चळवळ सुरू झाली तेव्हा तिचे स्वरूप काहीसे प्रतिक्रियात्मक होते. आता पुन्हा आपल्याला तिकडे वळावे लागणार आहे.

आधुनिकतेच्या नावाखाली हिंदू माणसाने आणि हिंदू कुटुंबानी स्वत्वच विसरावे हे योग्य वाटत नाही. साधेपणा आणि संयम हा हिंदू घरांचा विशेष ठरावयास पाहिजे जपानचे खरोखर कौतुक करावेसे वाटते. सर्व प्रकारे त्यांनी घराचे घरपण जपलेले आहे. कामागवर गेलेला माणूस घरी आला की तो ‘ घरातील ’कपडे घालतो. अभिवादन जपानी पद्धतीने केले जाते. भाषा जपानीच असते. मुलांना शिक्षण जपानी भाषेतूनच मिळते. आपल्या हिंदू कुटुंबातच विकृत परानुकरणाची लागण विशेषतः शहरी भागांत का व्हावी ? घरांचे विघटन का व्हावे ? सुखानुभूती देणाऱ्या स्वत्वाचा विसर आणि मानसिक गुलामीची पकड हीच हिंदू घर डळमळण्याची प्रमुख कारणे दिसतात.