स्वावलंबन आणि स्वाभिमान

स्वावलंबन म्हणजे दुसर्‍यावर अवलंबून न राहता स्वतः स्वतःचा भार उचलणे. ’जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला’ हे लक्षात ठेवून वागणे. घर उत्तम पध्दतीने चालण्यासाठी याची आवश्यकता असते. मग ती शारीरिक कष्टाची कामे असोत वा आर्थिक भार उचलायचा असो. सब घोडे बारा टक्के असा न्याय न लावता प्रत्येकाचे वय, शक्ती, क्षमता यांनुसार कामाची विभागणी करता येते. पण तो वाटा कुणीतरी लादण्यापेक्षा स्वतःच समजून उमजून आपल्यायोग्य भाग उचलने याचे नाव स्वावलंबन. घरात होणार हा संस्कार सार्वजनिक जीवनात देखील उपयोगी पडतो.

मग सार्वजनिक जीवनात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी प्रत्येकजण अगदी सहजपणे आपला वाटा उचलतो हे अनेकदा अनुभवास येते. डॉक्टर स्वतःच औषधे घेऊन जाऊन सेवा करतील, कुणी कपडे देतील, कुणी अन्न देतील, कुणी आपली जागा निवा-यासाठी उपलब्ध करून देतील, कुणी विचारपूस करून, मायेच्या स्पर्शातून दिलासा देतील, तर कुणी ढिगारे उपसून प्रेते काढून अग्निसंस्कारही करतील, असे अनुभावास मिळते. स्वावलंबनाबरोबरच सेवाभावाचा आणि आपुलकीचाही प्रत्यय यातून येत असतो.

अनेक वर्षाच्या परकीय राजवटीमुळे निर्माण झालेली लाचारी, भौतिकवादामुळे निर्माण झालेल्या नाना इच्छा व वासना, त्या पुऱ्या व्हाव्यात म्हणून भल्याबुऱ्या मार्गाचा अवलंब, सहजपणे सुखसोयी प्राप्त व्हाव्या हा भाव या सर्वाचा अनुभव आज समाजात पदोपदी आपल्याला येत असतो. मोठी रेघ लहान करायची असेल तर तिच्याशेजारी तिच्यापेक्षाही मोठी रेघ काढावी लागते, हे लक्षात घेऊन स्वाभिमान निर्माण करण्याचे काम घरांघरांतून मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. पोटाला चिमटा घेऊन जगणारी, पण कोणापुढे लाचारी न पत्करणारी आणि बाणेदारपणा न सोडणारी कितीतेरी कुटुंबे आजही दिसतात. ती सर्वांच्या आदराला पात्र ठरतात.