Tag Archives: अणुऊर्जा

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प

केवळ कोकणचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या विकास अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जैतापूर प्रकल्पाला पर्यावरण विषयक मान्यता दोन महिन्यापूर्वी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दिली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे दहा हजार मेगावॉट क्षमतेची वीजनिर्मिती महाराष्ट्रात होणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रापुढे असलेली वीजेची मागणी पूर्ण होण्यास मदत होणार असल्याने हा प्रकल्प फक्त महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र शासन आणि अणुऊर्जा विभाग, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे १८ जानेवारी रोजी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या हा वृत्तांत….

जैतापूर प्रकल्पास मान्यता मिळल्यानंतर या प्रकल्पाचे सर्व स्तरावरून स्वागतच झाले. जैतापूर प्रकल्प उभारताना मुख्यमंत्र्यानी जैतापूरवासियांना योग्य मोबदला तर दिला जाईलच पण त्याशिवाय त्याचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल असेही स्पष्ट केले होते. मात्र मध्यतंरीच्या काळात हा प्रकल्प पर्यावरणाच्या आणि येथील स्थानीकांच्या दृष्टीने असुरक्षित आहे असे काहीसे वातावरण निर्माण करण्यात आले होते. म्हणूनच या प्रकल्पाबाबत सर्वसामान्य जनता, पर्यावरणावादी, जैतापूर स्थानिक यांची बाजू ऐकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ जानेवारीला सर्वसमावेशक बैठक आयोजित केली. ही बैठक आयोजित करण्यामागचा मुळ उद्देश हाच होता की, या बैठकीदरम्यान या प्रकल्पाबाबत समाजात असलेले समज-गैरसमज दूर व्हावे आणि या प्रकल्पामुळे होणारा फायदा यांनी माहिती जैतापूर स्थानिकांना व्हावी.

या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नारायन राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पंतगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री संजय देवतळे, रत्नागिरीचे पालक मंत्री भास्कर जाधव, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्रकाश सोळंके गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, पर्यावरण सचिव वल्सा नायर सिंह, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव जे. एस. सहारीया, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. श्रीकुमार बॅनर्जी, अणुऊर्जा आयोगाचे सदस्य व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, भाभा ऑटोमिक रिसर्च संस्थेचे सहनिर्देशक श्रीकुमार आपटे, भाभा ऑटोमेटिक रिसर्च सेंटरचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. शरद काळे, न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे शशिकांत धारणे, आदी उपस्थित होते. या बैठकीला जाण्यापूर्वी या बैठकीच्या बाहेरच्या हॉलमध्ये अणुऊर्जा म्हणजे काय, अणु ऊर्जेचे फायदे, जैतापूर प्रकल्पाबाबतची माहिती पोस्टर्स द्वारे मांडण्यात आली होती मुख्यमंत्र्यांनी या पोस्टर्सवर नजर टाकत. न्युक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने मांडलेल्या स्टॉलवरील जैतापूर प्रकल्पाबाबतची माहितीपुस्तके याची माहिती घेतच सभागृहात प्रवेश केला. सभागृहात प्रवेश करताना त्यांनी या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्वांना हात जोडून अभिवादन केले तेव्हा उपस्थितांनीही टाळ्याच्या कडकडाटात मुख्यमंत्र्याचे स्वागत केले. आणि त्या क्षणी उपस्थितांपैकी सर्वांच्या मनात हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा आणि यासाठी मुख्यमंत्री घेत असलेल्या पुढाकाराबाबत आपल्या सर्वांचा त्याला पाठिंबा आहे असेच भाव दिसून येत होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आज आपण जैतापूर प्रकल्पाबाबत आपल्या सर्वांच्या मनात असलेल्या शंकाबाबत, समज-गैरसमजाबाबत तपशीलवार माहिती जाणुन घेण्याचा प्रयत्न करु या. त्यामुळे आज या बैठकीस या प्रकल्पाशी संबंदित असणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तिंना येथे बोलविण्यात आले आहे. त्यामुळेच या तज्ज्ञ लोकांकडून जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करुया असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. या तज्ञ लोकांनीही लोकांच्या मनात हा प्रकल्प उभा राहताना काय अडचणी येतील, कोणते प्रश्न उभे राहतील हे जाणून घेऊन नेमके त्याच प्रश्नाबाबत मार्गदर्शन केले आणि विशेष म्हणजे या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांनी ही माहिती संपूर्ण लक्ष देऊन अगदी वेळप्रसंगी नोंद घेऊनही ठेवली आणि शेवटी प्रश्नोत्तराच्या तासात आपल्या शंका, प्रश्न येथे उपस्थित असलेल्या तज्ज्ञांना विचारुन प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन केले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात पुन्हा एकदा स्पष्ट केले की, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देण्यात येईल.
या बैठकी दरम्यान या प्रकल्पाबाबत डॉ. अनिल काकोडकर, भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक तथा टाटा मेमोरियलचे संचालक यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीच्या सुरुवातीला थोडेसे गंभीर असणारे वातावरण बैठकीत उपस्थित केलेल्या प्रश्नांना व शंकांना उत्तरे देताना निवळत गेले आणि काही काही प्रश्नांतून बैठकीतला गंभीरपणा जाऊन बैठक टु-वे वाटू लागली. या बैठकी दरम्यान अनेकांनी या प्रकल्पाबाबत आपल्या मनात आलेले अनेक प्रश्न विचारल्याने त्यांचे समाधान झाल्याचे दिसत होते.

या बैठकीचे वैशिष्ट्ये असे म्हणावे लागेल की, मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाला आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी जैतापूर प्रकल्पासंदर्भात बैठक घेण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यामुळे या बैठकीला जैतापूर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.जैतापूर प्रकल्पामुळे होणारे परिणाम, तसेच या प्रकल्पामुळे होणारी विजेची बचत यामुळे या प्रकल्पांची संपूर्ण माहिती मिळाल्याचा आनंद या स्थानिकांच्या चेहऱ्यावर ही बैठक संपल्यावर दिसत होता. प्रकल्प झाला की प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन लांबते मात्र जैतापूर प्रकल्पातंर्गत प्रकल्पग्रस्तांचे आधी पुनर्वसन आणि त्यांना दिला जाणारा मोबदला यासाठी आपण स्वतः पाठपुरावा एनपीसीआयएलकडे करु असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी या प्रकल्पाला मान्यता देणार असल्याचे या बैठकीतच स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्याचा विकास करण्यासाठी आज राज्यात अनेक नवीन प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्या अणुऊर्जा प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे यात शंकाच नाही.

महाराष्ट्रासाठी कोणताही असुरक्षित प्रकल्प राज्यात आणणार नाही. जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प हा स्वच्छ, सुरक्षित आणि भारताच्या हिताचा असल्याने या प्रकल्पाला सर्वांनी सहकार्य करावे. या प्रकल्पाबाबत कोणाला काही शंका असल्यास त्यांनी तारापूर सारख्या अणुऊर्जा प्रकल्पाला भेट द्यावी. तसेच जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सर्व प्रकारच्या तांत्रिक शंकांचे निरसन राज्य शासन, केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विकास आणि राष्ट्रीय अणुऊर्जा महामंडळ (एनपीसीआयएल) यांच्या वतीने केले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले