Tag Archives: अन्न

लांडगा आणि कुत्रा

एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोडला होता. काही तरी खावयास मिळाले तर पाहावे, म्हणून तो चांदण्या रात्रीचा फिरत असता एका कुणब्याच्या खोपटाशी आला. तेथे दारावरच एक लठ्ठ कुत्रा बसला होता, त्याने त्यास रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर, लांडगा त्यास म्हणतो, ‘तू फार चांगला दिसतोस. मी खरेच सांगतो. तुझ्यासारखा देखणा आणि धष्टपुष्ट प्राणी मी आजपर्यंत पाहिला नाही. तर याचे काय कारण आहे सांग बरे ? मी तुझ्यापेक्षा शंभरपट अधिक उदयोग करितो, पण मला काही पोटभर खावयास मिळत नाही. ’ कुत्रा म्हणतो, ‘अरे, मी करतो तसे तू करशील तर तूही माझ्यासारखा सुखी होशील. ’ लांडगा विचारतो, ‘तू काय करतोस ?’ कुत्रा सांगतो, ‘दुसरे काही नाही, रात्रीच्या वेळी धन्याच्या दारापुढे पाहारा करून मी चोरास येऊ देत नाही. ’ लांडगा म्हणाला, ‘एवढेच ना ? ते मी मनापासून करीन गडया. अरे, जर मी रानात भटकत फिरून थंडीबारा सोसतो, तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे ?’ याप्रमाणे ते उभयता गोष्टी करीत होते, इतक्यात कुत्र्याच्या गळ्यास दोरीचा करकोचा पडला तो लांडग्याने पाहिला, तेव्हा तो कुत्र्यास विचारतो, ‘गडया, हे तुझ्या गळ्यास काय रे दिसते ?’ कुत्रा बोलला, ‘अंः ! ते काही नाही. ’ लांडगा म्हणाला, ‘नाही, पण मला तर कळू देशील काय ते !’ कुत्रा सांगतो, ‘अरे, मी अंमळ द्वाड आहे, लोकांस चावतो, म्हणून व मी दिवसास निजलो म्हणजे रात्रीचा पाहारा चांगला करीन, म्हणून माझा धनी मला दिवसास दोरीने बाधीत असतो, परंतु इकडे दिवस मावळला रे मावळला, की त्याने मला सोडिलेच. मग मी राजा; वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. माझ्या खाण्यापिण्याविषयी म्हणशील, तर माझा धनी मला आपल्या हाताने भाकर चारतो. घरची सगळी माणसे मजवर फार माया करितात. पानावर भाकर तुकडा उरेल, तो मजवाचून दुसऱ्या कोणास टाकीत नाहीत. तेव्हा आता पहा बरे, तू जर माझ्याप्रमाणे वागशील, तर तूही किती सुखी होशील ?’ ते ऐकताच लांडगा मागल्या पायी पळत सुटला, त्यास कुत्रा हाक मारतो, ‘रे ये, रे ये, असा पळतोस काय ?’ लांडगा दुरूनच उत्तर करितो, ‘नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुला लखलाभ होवो. स्वच्छंदीपणाने वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग; तुझ्यासारखा बाधून ठेवून मला कोणी राजा केला, तरी ते राजेपण मला नको !’

तात्पर्य: स्वतंत्रपणा असून गरिबीही चांगली, पण परतंत्रपणा असून मोठी पदवीही चांगली नव्हे.