Tag Archives: अपराधी

दोन अपराधी !

एका बादशहानं आपल्या सेवकांसह वनात शिकारीसाठी गेला होता. शिकार करता करता सुर्यास्त व्हायची वेळ आली, तेव्हा त्याला नमाज पढता यावे, यासाठी सेवकांनी एका स्वच्छशा जागी रेशमी चादर अंथरली. त्या चादरीवर बसून, बादशहा नमाज पढू लागला.

थोड्याच वेळात तिथून एक बाई अत्यंत लगबगीने गेली. जाता जाता ज्या चादरीवर बादशहा नमाज पढत होता त्या चादरीवर त्या बाईचं पाऊल पडलं व तिच्यावर तिच्या पावलाच्या धुळीचा ठसा उमटला.

ते पाहून क्रुध्द झालेल्या बादशहानं एका सेवकाला, ‘त्या बाईला आपल्याकडे घेऊन येण्याचा हुकुम फ़र्माविला.

सेवकानं त्या बाईला बादशहापुढं हजर करताच बादशहा तिला म्हणाला, ‘मी या राज्याचा बादशहा असून, ज्या चादरीवर मी नमाज पढत होतो त्या चादरीवर तू पाय देऊन गेलीस. तू केवढा भयंकर गुन्हा केला आहेस, यावी तुला कल्पना आहे?’

यावर ती बाई हात जोडून म्हणाली, ‘सरकार माझा घरधनी बारा वर्षापुर्वी परदेशी गेला होता; तो गलबतानं थोड्याच वेळात जवळच्या बंदरात उतरणार आहे. त्याच्या भेटीला जायला निघालेल्या माझ्या मनात फ़क्त एकमेव त्याच्याबद्दलचे विचार आपल्यामुळे, इथून घाईघाईनं जाताना मला चादरच काय, पण आपणही दिसला नाहीत. तेव्हा आपल्या चादरीवर जो माझा पाय पडला, तो अजाणता पडलेला असल्यामुळे, आपण मला झाल्या अपराधाबद्दल क्षमा करावी.’

बादशहा म्हणाला, ‘तुझं या चादरीवर पडलेलं पाऊल अजाणता का पडलेलं असेना त्यामूळे तू प्रत्यक्ष बादशहाचा अपमान केला आहेस; तेव्हा मी तुला शिक्षा देणार म्हणजे देणार.’

यावर ती बाई म्हणाली, ‘खाविंद, तसं पाहिलं, तर आपण नमाज पढत असताना, दोघांच्या हातून अपराध झाला आहे, तेव्हा दुसऱ्या अपराध्याला जर आपणा शिक्षा देणार असाल तरच मला शिक्षा देणे योग्य होईल. कारण दुसऱ्या माणसाचा अपराध तर फ़ारच मोठा आहे.’

बादशहानं आश्चर्यानं विचारलं, ‘दुसरा अपराधी ? कोण तो दुसरा अपराधी, आणि कोणता तो त्याचा मोठा अपराध ?’

बाई म्हणाली, ‘हुजूर, खुद्द आपणच ते दुसरे मोठे अपराधी. मी आपला म्हणजे बादशहाचा अपराध केला असला, तर आपण प्रत्यक्ष परमेश्वराचा अपराध केला आहे. कारण नमाज पढत असताना जर आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे म्हणजे अल्लाकडे केंद्रीत झालेलं असतं, तर चादरीवर माझा पडला, ही गोष्ट आपल्या लक्षात आली नसती. देवाची प्रार्थणा करताना किंवा नमाज पढताना जर लक्ष असं सगळीकडे ठेवलं, तर ती प्रार्थना, प्रार्थना ठरत नाही आणि नमाज, नमाज ठरत नाही. ती नुसती देवाची फ़सवणूक ठरते.’

त्या बाईच्या त्या बोलांनी खाविंद मनात वरमून, बाहेरून प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला शिक्षेऎवजी इनाम देऊन, तिच्या पतीच्या भेटीला जाऊ दिले.