Tag Archives: अपराध

यात माझा काय अपराध?

श्री पांडूरंगाला अलंकार वस्त्रे अर्पण करण्यासाठी एक श्रीमंत मनुष्य बऱ्याच दूरच्या गावाहून पंढरपूरास गेला. परंतू मंदिरापाशी जातो, तर त्याला मंदिराचा पुढला दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. मंदिराच्या पायरीवर बसलेला एक पुजारी म्हणाला, ‘देव झोपलाय.’

त्या धनवानाला थांबवायला वेळ नव्हता, पण त्याचबरोबर ते वस्त्रालंकार तर त्याला स्वत:च पांडूरंगाच्या अंगावर चढवायचे होते. त्याने सभामंडपात असलेल्या बऱ्याच बडव्यांनी भेट घेऊन विनवणी केली, पण कुणीच त्याला दाद देइना. एका व्यवहारी बडव्याने मात्र त्या धनिकाला त्याने किती वस्त्रे व अलंकार आणले आहेत ते दाखवायला सांगितले व ते बरेच असल्याची खात्री होताच, तो त्या श्रीमंताला म्हणाला. ‘शेट, ठीक आहे. मी दरवाजा उघडतो, तुम्ही माझ्याबरोबर गाभाऱ्यात चला आणि स्वत: पांडूरंगाच्या देहावर पोषाख व अलंकार चढवा.’

त्या बडव्याने त्याप्रमाणे केल्यावर, बाकीचे बडवे त्याच्यावर भडकले. त्यांनी त्या मंदिराच्या विश्वस्तांकडे त्याच्याविरुध्द तक्रार केली. सर्वत्र एकच गहजब सुरु झाला ‘या भिकंभटाने देवाची झोपमोड केली !’

अखेर त्या बंडखोर बडव्याच्या नियमबाहय वागण्याबद्दल विचार करुन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी, मंदिराच्या समस्त विश्वस्त व बडवे मंडळीची संयुक्त सभा भरली व तिच्यात त्या अपराधी बडव्याला उपस्थित होण्याचा हुकुम सोडला गेला.
सभेस आलेल्या त्या बडव्याला प्रमुख विश्वस्ताने विचारले, ‘पांडुरंग झोपला असताना तू गाभाऱ्याचं दार उघडून त्या धनिकाला आत नेलेस व पांडुरंगाला अलंकार वगैरे अर्पण करण्याची तू त्याला मुभा दिलीस, हे खरे आहे का?’
त्या बडव्यानं उत्तर दिलं, ‘खरं आहे.’
विश्वस्तानं विचारलं, ‘तू असं का केलसं?’
बडवा – सोन्यारत्नांचे अलंकार ही ‘लक्ष्मी’ आहे, हे आपल्याला मान्य आहे.
विश्वस्त – होय.
बडवा – पांडुरंग हा मूळचा विष्णू आहे, हे आपल्याला मान्य आहे ?
विश्वस्त – मान्य केलंच पाहिजे.
बडवा – मग आता तुम्हीच सांगा, की पती झोपेत असला तरी त्याच्याकडे जाण्याचा पत्नीला अधिकार असल्यामुळे, मी त्या अलंकाररुपी लक्ष्मीला तिच्या पतीकडे जाऊ दिले, यात माझा काय अपराध ?

या बिनतोड युक्तीवादामुळे ती सभा निरुत्तर झाली आणि भिकभंटाची स्वारी सर्वानुमते निरपराध ठरली.