Tag Archives: अफ़झलखान

गुप्त संदेश

हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन, महाराष्ट्रात दिवसेंदिवस हातपाय पसरु लागलेल्या शिवाजीराजांनी जिवंत अथवा मेलेल्या स्थितीत घेऊन येण्याच्या पैजेचा विडा अफ़झलखान नावाच्या एका शक्तिमान, शूर व पाताळयंत्री सरदाराने विजापूर येथे भरलेल्या आदिलशाही दरबारात उचलला, मग प्रचंड युध्दतयारीनिशी मजल दर मजल करीत व वाटेत लागणारी मंदिरे अथवा मंदिरातील मुर्ती फ़ोडीत, तो वाईकडे येऊ लागला.

शिवरायांचा नायनाट करण्याच्या हेतूनं अफ़झलखान विजापुराहून निघाल्याचं वृत्त समर्थ रामदास स्वामींनी कळताच, त्यांनी राजगडावर असलेल्या शिवप्रभुंना देण्यासाठी आपल्या एका शिष्यासंगे एक पत्र पाठवलं.

तो ‘रामदास’ राजगडावर पोहोचला व महाराज राहात असलेल्या वाड्यापुढील अंगणात उभे राहून त्यानं ‘जय जय रघुवीर समर्थ !’ असा गजर केला.मातोश्री जिजाबाई यांनी तो आवाज ऎकताच त्या स्वत: उठल्या आणि सुपात तांदूळ घेऊन, ती भिक्षा त्या तरुण बैराग्याला घालायला त्या गेल्या.

मासाहेबांनी घातलेली भिक्षा स्वीकारून तो ‘रामदासी’ बारीक आवाजात त्यांना म्हणाला, ‘मासाहेब ! समर्थांचा एक गुप्त संदेश महाराजांना पोहोचता करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. त्यांची व माझी भेट घडवून आणण्यासाठी आपण मजवर कृपा कराल का ?’

मासाहेबांनी एका सेवकासंगे त्य रामदासीला महाराजांकडे पाठवून दिले. त्या तरुण बैराग्यानं महाराजांना वंदन करुन, झोळीतून आणलेलं आपल्या गुरुंचं पत्र त्यांच्या हाती दिलं. ते ओवीबध्द पत्र महाराज वाचू लागले. त्यात पुढीलप्रमाणे मजकूर होता :-
विवेकें करावे कार्यसाधन |
जाणार नरतनू हे जाणीन |
पुढील भविष्यार्थी मन |
अहाटोच नये ||१||
चालो नये असन्मार्गी |
सत्यता बाणल्या अंगीं |
रघुवीर-कृपा प्रसंगी |
दासमाहात्म्य वाढवी ||२||
रजनीनाथ आणि दिनकर |
नित्यनेमे करिती संचार |
घालिताति येरझार |
लाविले भ्रमण जगदीशे ||३||
आदिमाया मूळ भवानी |
हेचि जगाची स्वामिनी |
एकांती विवंचना करोनी | इष्ट योजना करावी ||४||

हे पत्र वाचून व त्यातील स्वराज्याच्या काळजीबरोबरच समर्थांच्या कल्पकतेची कल्पना येऊन, हे ओवीबध्द पत्र शत्रुच्या हाती पडलं असतं, तर त्यात समर्थांनी शिवाजीमहाराजांना परमार्थांचा उपदेश केला आहे, असा त्या शत्रुचा समज होऊन त्याने त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं असतं, परंतु हे पत्र साधं नव्हतं. त्या पत्रातील पहिल्या चौदा ओळींची पहिली अक्षरं एका पाठोपाठ एक अशी वाचल्यास, त्यांतून समर्थांनी महाराजांना -‘विजापुरचा सरदार निघाला आहे’ …. असा गुप्त संदेश देऊन शेवटल्या दोन तुकड्यांच्या ओळीत त्यांना उपदेश केला होता –
एकांती विवंचना करोनी | इष्ट योजना करावी ||
म्हणजे ‘एकांतात काळजीपूर्वक विचार करुन शत्रुचा पराभव करण्याची योग्य ती उपाययोजना करावी.