Tag Archives: अब्रु

अब्रुची जपणूक

खाणावळीत पोटभर जेवून हात धुतल्यावर एका लुच्च्या माणसानं आपल्या खिशात हात घातला, आणि जीभ चावून तो खाणावळीच्या मालकाला म्हणाला, ‘शेट ! घोटाळा झाला ! मी इकडे येताना पैसे आणायला विसरलो. मी जातो आणि पंधराविस मिनिटात पैसे घेऊन येतो. चालेल ना?’

खाणावळवाला -साहेब ! हे काय विचारणं झालं ? अहो पंधरा -वीस मिनिटात पैसे आणून देण्याची घाई कशाला करता ? तुमच्यासारखा सज्जण माणूस जेवणाचे पैसे थोडेच बुडवणार आहे? आता एक गोष्ट मात्र आहे ती अशी की, या धंद्याच्याअ घाईगर्दीत आमच्या लक्षात राहावं, म्हणून अशा पैसे न देता जेवून जाणाऱ्या सज्जनांची नावे व पत्ते आम्ही समोरच्या भिंतीवर टांगलेल्या त्या फ़ळ्यावर लिहून ठेवतो. म्हणून तुमचं नाव व पत्ता तिथे लिहून ठेवू व पैसे आल्यावर पूसुन टाकू.

फ़ुकट्या -पण शेट, तुम्ही माझं नाव व पत्ता त्या फ़ळ्यावर लिहून ठेवल्यास, इथे जेवायला येणारीए माणसं ते वाचतील आणि माझ्यासारख्या अब्रुदार माणसाल कमीपणा येईल, त्याचं काय ?

खाणावळवाला- छे, छे, साहेब ! आपल्यासारख्या खानदानी माणसाच्या नावाला कमीपणा येईल, असे आम्ही कसे वागू ? त्यातून तुम्ही तर आमचे आश्रयदाते. तेव्हा त्या फ़लकावर लिहिलेलं तुमचं नाव वगैरे कुणी वाचू नये, म्हणून मी तुमच्या अंगातला सदराही त्या फ़लकाच्या खिळ्यावर टांगून ठेवीन, म्हणजे तुमचं नाव व पत्ता कुणाला वाचता येणार नाही आणि तुमच्य अब्रुला धक्का पोहोचणार नाही. पुन्हा तुम्ही सवडीने पैसे आणून दिलेत, की तुमचं नाव व पत्ता पुसला जाईल, आणि तुमचा सदरा तुम्हाला परत दिला जाईल. पाहिलंत ना आम्ही आमच्या गिऱ्हाइकांच्या अब्रुला किती जपतो ते ?’

फ़ुकट्या – (दुसऱ्या खिशात हात घालून) सापडले बरं का पैसे मला ? हे घ्या पैसे उगाच सदरा इथे राहायला नको.