Tag Archives: आर्द्रता

अळंबी संवर्धन

धिंगरी अळंबीच्या लागवडीसाठी २५-३७ अंश सेल्सीयस तापमान आणि ८०-८५ आर्द्रता आवश्यक असते. त्याचप्रमाणे वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल अशी निवाऱ्याची जागा असावी. भाताचा चांगला, सुका पेंढा घ्यावा आणि त्याचे बारीक तुकडे करावेत. पेंढा पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात ९ ते १० तास भिजत ठेवावा. नंतर बाहेर काढून त्यामधील पाण्याचा पूर्ण निचरा होऊ द्यावा. वापरण्यापुर्वी पेंढा निर्जंतुक करणे आवश्यक असते. त्यासाठी पोते उकळत्या पाण्यात ३० मिनीटे बुडवून ठेवावे. त्यानंतर १५०-२०० गेजच्या जाडीची ३५ सेंमी व्यास आणि ५५ सेंमी लांबीची पॉलिथीनची पिशवी घेऊन ती ४ टक्के फॉरमॅलीनने निर्जंतुक करावी. या पिशवीत निर्जंतुक केलेले पेंढ्याचे तुकडे आणि अळंबीचे बी (स्पॉन) यांचे एकावर एक असे ५-६ थर द्यावेत. पिशवीस लंबगोल आकार द्यावा.

अळंबीचे बी ओल्या पेंढ्याच्या वजनाच्या २-३ टक्के वापरावे. पिशवीचे तोंड दोऱ्याने बांधून तळाशी व वरच्या भागास ३-४ लहान भोके पाडून ती निवाऱ्याच्या ठिकाणी १५ दिवस ठेवावी. साधारणपणे १५-२० दिवसांनंतर पेंढ्यावर पांढऱ्या बुरशीची वाढ झालेली दिसून येईल. यावेळी पिशवी फाडून अलग करावी. आणि पेंढ्याचा गठ्ठा स्टँडवर ठेवावा. त्यानंतर पेंढ्याचा गठ्ठा वाळू नये म्हणून दिवसातून २-३ वेळा थोडेस पाणी फवारावे. हवेतील आद्रता ८० ते ८५ टक्के व तापमान २५ ते २७ अंशा सेल्सियसच्या दरम्यान राहिल याची दक्षता घ्यावी. पॉलिथीनची पिशवी काढून टाकल्यानंतर साधारणपणे ३-४ दिवसांनी अळंबी तयार होते. पूर्ण वाढ झालेली अळंबी शिंपल्याच्या आकाराची दिसते. तयार झालेली अळंबी चाकूने कापून घ्यावी. आणि प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून विकावी. पहिली काढणी पिशवी भरल्यापासून २४-२५ दिवसात होते. त्यानंतर १०-१२ दिवसांच्या अंतराने दुसरी काढणी करावी. प्रत्येक काढणीनंतर गठ्ठ्यातील १ सेंमी खरबडून काढावा व पाण्याची फवारणी करावी. या जातीची अळंबी उन्हामध्ये ३-४ दिवसात सहजरित्या वाळविता येते. सर्वसाधारणपणे १ किलो सुक्या पेंढ्याच्या गठ्ठ्यांपासून सुमारे १ किलो ताजी अळंबी मिळते. अळंबीला बाजारात भरपूर मागणी असून निर्यातही मोठी होते. वाळल्यानंतर अळंबीचे वजन १/१० होते. वाळल्यानंतर अळंबी किफायतशीर भावात खपते. वाळलेली अळंबी खाण्यासाठी वापरण्यापूर्वी पाण्यात अर्धा ते एक तास भिजवून ठेवावी म्हणजे चवीला ताज्या अळंबी प्रमाणे लागते.