Tag Archives: आशाकिरण

स्त्री स्वातंत्र्य व व्यक्तिमत्त्व

स्त्रिया या प्रथमतः स्त्रियाच असून, त्या ज्याक्षणी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व धारण करतील, त्याक्षणी हे जग सर्वार्थानं वेगळं अधिक सुंदर, अधिक आनंदमय होईल. पुरुषांनी स्त्रियांचं मानसशास्त्र पूर्णतः दडपून टाकल आहे. आपल्याला जे दिसून येतं ते काही स्त्रियाचं खरंखूरं मानसशास्त्र नसून, ‘ पुरुषांनी तयार केलेलं ’, ‘ पुरुषांनीच स्त्रियांमध्ये निर्माण केलेले ’ असं मानसशास्त्र आहे. खरे पाहू जाता जेवढे समजले जातात तितके काही स्त्री आणि पुरुष विभिन्न नाहीत. त्यांचे शरीरशास्त्र वेगळे आहे आणि त्यांचे मानसशास्त्रही निश्चितपणे वेगळे आहे. परंतु ते दोघेही दर्जाने बरोबरीचेच आहेत.

पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये गुणात्मकतेचा काही फरक नसून असलाच तर तो एखाद्या विशिष्ट पैलूवर भर देण्यापुरताच मर्यादित आहे. जाणिवेच्या पातळीवर स्त्रियांमध्ये स्त्रीत्वाचे, तर गुप्तपणे पुरुषांचे गुण असतात. अशाच प्रकारे पुरुषांमध्येही गुप्तपणे स्त्रियांच्या गुणांचा वास असतो. आपण संपूर्णपणे पुरुष अथवा स्त्री काहीतरी एकच बनावे यासाठीच आपली मने समाजाकडून घडविली जातात. किंबहुना या एकांगी भूमिकेवरच समाजाकडून अधिक भर दिला जातो. समाज आपल्याला परिवर्तनशील होऊ न देता ठोकळेबाज, साचेबंद, घडीव बनवितो आणि याचमुळे मानवतेला उतरती कळा लागते; स्त्री आणि पुरुष यांचे पूर्णत्वच पूर्णपणे हरवून जाते !

स्त्रीत्व-मूलभूत व्यक्तिमत्त्व
स्त्रियांमध्ये काही प्रसंगी स्त्रीत्वापेक्षा पुरुषत्वाचेच गुण प्रकर्षाने दिसून येतात, तर पुरुषही कित्येकदा फारच ‘बायकी’ वाटतात. आयुष्यात कोमल क्षणांबरोबरच कठोर क्षणही असू शकतात, चढाईखोरपणाबरोबरच सहनशीलताही येऊ शकते… परंतु आजपावेतो ‘पुरुष हा सदैव पुरुषच’ तर ‘स्त्री ही सतत स्त्रीच’ अशीच समाजाची धारणा करून देण्यात आली आहे. ही अतिशय अनैसर्गिक आणि चुकीची योजना आहे.
कदाचित एकादी मुलगी – स्त्री पुरुषाप्रमाणे वागू लागली आणि ती महत्त्वाकांक्षी, आक्रमणशील असेल तर तिच्या शरीरांतर्गत स्त्रावग्रंथीचाच तो दोष असल्याचं मानलं जातं. अशा मुलीला ‘पुरुषी’ मानणं केवळ मूर्खपणाचंच आहे. स्वभावाची पुरुषी किंवा बायकी अशी विभागणी नैसर्गिकरीत्या झालेली नसून राजकीय, सामाजिक कारणासाठीच करण्यत येणारी आहे. सतत दिवसाचे चोवीस तास स्त्रियांनी स्त्रियांचीच, तर पुरुषांनी पुरुषांची भूमिका बजावण्याची त्यांच्यावर झालेली सक्ती ही अतिशय अनैसर्गिक असून जगातील बहुतेक दुःखाचा उगम यातूनच फार मोठ्या प्रमाणावर होतो.

पुरुषांवर ज्यावेळी कोमल, हळूवारपणानं वागण्याचे प्रसंग येतात तेव्हा त्यांच्यामध्ये स्त्रियांचे गुण दिसणं, ते जागृत होणं अगदी स्वाभाविक आहे. तर कित्येकदा रागाच्या भरात स्त्रियाही पुरुषांपेक्षा घातकी, कठोर बनतात. असे प्रसंग, भूमिका सतत बदलत राहणं हेच नैसर्गिक असून सुसंवाद, लय त्यामुळंच निर्माण होते. स्त्रियांच्या खऱ्या, शाश्वत मानसशास्त्राचं आकलन होण्यासाठी त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देऊन पाहिले पाहिजे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, असं घडलं तर त्या पुरुषांच्या कितीतरी पुढं निघऊन जातील. स्त्रियांवरील अगणित बंधनांबरोबरच त्याच्यावर इतके चुकीचे संस्कार करण्यात आले आहेत, की त्यांच खरं मूळ स्वरूपात मानसशास्त्र ठरविणं अवघड होऊन बसलं आहे.स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असण्याची आवश्यकता मूलभूत आहे. स्त्रिया या प्रथमतः स्त्रियाच असून त्यांचं स्त्रीत्व हेच मूलभूत आहे. त्यामूळंच स्त्रिया ज्याक्षणी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व धारण करतील त्याक्षणी हे जग सर्वार्थानं वेगळं, अधिक सुंदर, अधिक आनंदमय बनेल.

ऐतिहासिक काळापासूनच स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व पुरुषाभोवती केंद्रित करण्यात आले आहे. असुरक्षिता, दारिद्र्य यांची भीती सतत असल्यानंच त्या पुरुषांना धरून असतात. त्यांना भयंकर भिती वाटते; किंबहुना दाखविली जाते. पुरुषांचीच ही युक्ती आहे. भीतीग्रस्त झाल्यावरच स्त्रियांवर आधिपत्य गाजविता येतं. निर्भय माणसावर कोणी हुकूमत दाखवू शकत नसतो.

स्त्री ही उपभोग्य वस्तू नव्हे
स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य हे मिळालंच पाहिजे, त्यांच्या स्वातंत्र्याबरोबरच पुरुष सुद्धा स्वतंत्र होतील. इतरांना दास्यामध्ये ठेवून कोणीही खऱ्या अर्थानं स्वतंत्र होऊ शकत नाही. मालक हा नोकराचाच गुलाम असतो. पुरुष हा स्वतंत्र नसतो; कारण तो खऱ्या अर्थानं तसा स्वतंत्र होऊ शकत नाही. जेव्हा स्त्रिया म्हणजे निम्मी मानवजातच पारतंत्र्यात असते, तेव्हा तो कसा स्वतंत्र राहू शकेल ? पुरुषांचं स्वातंत्र्य वरवरचं, केवळ तोंड्देखले असतं स्त्रियाच्याच मुक्तीबरोबर पुरुषही विमुक्त होतील.

खाजगी मालमत्तेचा एक भाग म्हणूनच ( सध्या अस्तित्वात असलेले ) पती-पत्नी संबंध निर्माण झाले ( आहेत ). स्त्री ही जर संपूर्ण आयुष्यभर एकाच पुरुषाच्या मालकीची झाली, राहिली तर ती त्याची पत्नी होते आणि फक्त एका रात्रीपुरतीच कोणा तरी पुरुषाची मालकी तिनं पत्करली, तर मात्र पत्नी नाही. ‘ स्त्री हीसुद्धा मालमत्ताच आहे,’ हे एकच मूलतत्त्व या सर्वांमागे आहे. किंबहुना याचमुळे लग्नसंस्था आणि वेश्याव्यवसाय हे समाजामध्ये बरोबरीनंच चालत आले आहेत.

माझा असा दृष्टीकोण आहे की, स्त्री एक निर्जीव वा उपभोग्य नसून एक वेगळी व्यक्ती आहे. पतीची पत्नीवर किंवा पत्नीची पतीवर कोणाचीही कोणावर मालकी असण्याचं कारण अवनतीची आहे. स्वातंत्र्याची थोडीफार कल्पना आपल्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जोपासण्याची पात्रता आल्यावरच येऊ शकेल. समाजामध्ये स्त्रीचा एक वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून कधीच विचार केला जात नाही. ती पत्नी, नंतर आई व शेवटी आजी होते…. परंतु कधीही एक स्त्री म्हणून ती संबोधिली जात नाही. तिला सदैव कोणा दुसऱ्याबरोबरच कोणत्या तरी संदर्भात आणि कोणाशी तरी असणाऱ्या नात्यानंच ओळखलं जातं.

स्त्रीत्वः मानवजातीचा आशाकिरण
स्त्रीने स्वतः तर स्त्रीच राहिले पाहिजे एवढेच नव्हे तर पुरुषांमध्येही थोडे स्त्रियांचे गुण आणण्यामध्ये तिनं त्यांना मदत केली पाहिजे. स्त्रीलाच केवळ पुरुषांबरोबर नव्हे, तर पुरुषांनाही स्त्रियांपासून स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. मानवजातीचा एकमेव आशेचा किरण ‘स्त्रीत्वाचे’ गुण असणं, जोपासणं हाच आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही स्त्रीगुण असणाऱ्या एका अतीव प्रेमाच्या आनंदाच्या अवस्थेमध्ये रुपांतरित करणं आवश्यक आहे.महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्री ही वेगली असली तरी त्याच्या बरोबरोचीच आहे. तिलाही तेवढेच हक्क आहेत. दोघांमध्ये काही फरक जरून आहे, परंतु हा भेद सुंदर असून तो तसा राहणंच आवश्यक आहे.

स्त्री आणि पुरुषामधील भेद नष्ट करण्याची प्रवृत्ती सध्या पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये वाढीस लागली आहे. पश्चिमेतील स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाला मुकू लागल्या आहेत. स्त्री आणि पुरुष यांमधील फरक दूर झाला तरच आपण (स्त्री आणि पुरुष ) समान दर्जांचे मानले जाऊ, अशीच तेथील-ख्यत्वे स्त्री-मुक्तीची चळवळ करणाऱ्यांची धारणा आहे. यामागे ‘स्त्री ही पूर्णपणे पुरुषाप्रमाणे झाली तरच त्याची बरोबरी करू शकेल,’ अशी भावना आहे….. परंतु असा दृष्य सारखेपणा म्हणजे समानता नव्हे, आणि जर स्त्री ही सर्वच बाबतींत पुरुषाच्याचसारखी बनेल तर आपलं सर्व आकर्षण, सौंदर्य, तसंच ऐटही ती गमावून बसेल….. !

[आचार्य रजनीश यांनी पुण्याच्या रजनीशा आश्रमामध्ये केलेल्या प्रवचनांपैकी काहींचा समावेश ]