Tag Archives: उज्ज्वल निकम

कसाबच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

सुप्रीम कोर्टाने क्रूरकर्मा कसाब याच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. विशेष दहशतवादविरोधी कोर्टाने सर्वप्रथम कसाबला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर मुंबई कोर्टाने गेल्या वर्षी हा निर्णय कायम ठेवला होता आणि आता, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला आहे. मात्र, फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांच्या विरोधात कुठलाही तगडा पुरावा नसल्याकारणाने सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवले व राज्य सरकारने जी याचिका दाखल केली होती, ती फेटाळून लावली.

‘२६/११ ला सायंकाळी कसाबने धुमाकूळ घालून देशाच्या सुरक्षिततेला एक प्रकारचे आव्हान दिले होते. कसाब एखाद्या रोबोटसारखा काम करत नव्हता. त्याच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. त्यावरुन त्याला शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे’, असे मत न्यायाधीश आफताब आलम आणि सी. के. प्रसाद यांच्या खंडपीठाने कसाबच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली. कसाबविरुद्ध ही गंभीर गुन्हे नोंदवण्यात आली आहेत-देशाविरुद्ध युद्ध पुकारुन देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणे, हत्येचे ‘प्लॅनिंग’ करणे, हत्या करण्यासाठी इतर अतिरेक्यांना मदत करणे. भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२ अन्वये आणि दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार कसाबची फाशी सुप्रीम कोर्टाने निश्चित केली.

कसाबच्या वकिलाने त्याची बाजू मांडताना वक्तव्य केले होते की, ‘कसाब वयाने मोठा नव्हता. त्याचे ‘ब्रेन वॉश’ करुन त्याला ‘जिहाद’ साठी प्रवृत्त करण्यात आले. तो फक्त एका रोबोटसारखा काम करत होता’. पण हे सगळे मुद्दे खंडपीठाने खोटे ठरवले. मात्र, सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पर्याय कसाबकडे आहे. जर ही याचिका सुद्धा फेटाळण्यात आली तर तो क्यूरिटिव्ह पिटीशनचा पर्याय वापरु शकतो. तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्जही दाखल करु शकतो.

दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, ‘सुप्रीम कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे देशातल्या नागरिकांमध्ये हर्षाचे वातावरण आहे. पण माझी इच्छा आहे की कुठलाही उशीर न करता लवकरात लवकर त्या दुष्कर्मी कसाबला फासावर लटकवा’.