Tag Archives: उत्तान प्रणयप्रसंग

दूरदर्शन

असाच आणखी एक घटक आहे दूरदर्शन संच, वास्तविक लोकशिक्षणाचे माध्यम म्हणून त्याचा कितीतरी चांगला उपयोग होऊ शकेल, असे कार्यक्रम दाखवलेही जातात. पण त्यांचे प्रमाण फारच थोडे असते. हाणामारी, उत्तान प्रणयप्रसंग, नाचगाणी, व्यक्तिस्वातंत्र्याच्या आवरणाखाली अनैतिक विचारांची मांडणी. ( उदा. नोकरीसाठी परगावी राहणाऱ्याची पत्नी स्वतःच्या अनैतिक वर्तनाची भलावण करताना म्हणते. “ मी तरुण आहे. मी माझे मन दडपून किती दिवस राहू ? एक व्यक्ती म्हणून मला सुख मिळविण्याचा हक्कच आहे. ” ) त्यात दर्शविले जाणारे विलासी जीवन-मोठाले बंगले -दाराशी गाड्या – या सर्व गोष्टी वास्तव जीवनापासून आपल्याला दूर नेतात.

काल्पनिक साम्राज्यात रमल्यानंतर रोजच्या जीवनातील कष्ट आणि अभाव यांमुळे वैफल्य वाटु लागते, अन अशाच मालिका दाखविण्याची वेगवेगळ्या वाहिन्यांची अहमहमिका लागली आहे. पण त्यातल्या त्यात एक चांगले आहे. टी. व्ही. बंद करणे आमच्या हातात आहे. काय पाहावे व काय पाहू नये हा निर्णय आपण घेऊ शकतो. त्याहीपेक्षा दिसणाऱ्या दृश्यांवर त्यातले चांगले काय व वाईट काय हे समजावून घेऊ व सांगू शकतो. वास्तव व पडद्यावरील जग यातले अंतर जाणू शकतो. अयोग्य दृश्यांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यासाठी स्वतः आपली व कुटुंबीयांची मानसिक घडण बनवायला हवी. लहान मुले जहिराती पाठ म्हणून दाखवतात याचे कौतुक थांबवायला हवे. परस्परांशी चर्चा, विचारविनियम करायला हवा व हे फक्त माझ्याच, माझ्या कुटुंबीयांपुरतेच मर्यादित न ठेवता सर्वांचे, सामूहिक व्हायला हवे.