Tag Archives: कर्ज

लोण्याचे कर्ज

एका गावात ‘चेन्नव्वा’ या नावाची एक गवळण रहात होती. दोन म्हशी पाळून त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधदुभत्यावर ती आपल्या छोट्या कुटुंबाची गुजराण काटकसरीनं, पण सुखानं करीत होती तिच्याच शेजारी मल्लव्वा या नावाची दुसरी एक गवळण राहत होती, तिच्या पन्नास म्हशी होत्या.

एकदा धनिक मल्लव्वाला लोणी कमी पडलं, म्हणून तेनं चेन्नव्वाकडून पाच शेर लोणी उसनं घेतलं. आठ दहा दिवस होऊन गेले तरी ती लोणी परत करत नाहीसे पाहून, चेन्नव्वाने मल्लवाकडे त्या लोण्याची मागणी केली, पण काही केल्या ती ते लोणी परत करीना !

एकदा मल्लवाकडे जाऊन चेन्नव्वा तिला म्हणाली, ‘तु माझ्याकडून उसनम म्हणून घेतलेलं पाच शेर लोणी मला नक्की कधी परत करणार ते मला सांग, म्हणजे मला तुझ्याकडे उगाच खेटे घालायला नकोत.’

चेन्नव्वाचा हा प्रश्न ऎकून लुच्ची मल्लव्वा तिच्यावर उलटून म्हणाली, ‘अग, वा ग वा ! तूच माझ्याकडून पाच शेर लोणी उसनं नेलंस आणि वर माझ्याकडेच तेवढ्या लोण्याची मागणी करतेस ? थांब मी न्यायालयात जात्ये, आणि तू माझं बुडविलेलं लोणी तुझ्याकडून वसूल करते.’

बोलल्याप्रमाणे ती नीच मल्लव्वा खरोखरच न्यायालयात गेली व तिन चेन्नव्वाकडून पाच शेर लोण्याच्या कर्जवसुलीसाठी, तिच्याविरुध्द दावा गुदरला. न्यायमुर्ती रमण यांनी दोघींच म्हणणं ऎकून घेतलं आणि काहीएक न बोलता, त्या दोघींना दुसऱ्या दिवशी पुन्हा न्यायालयात येण्यास सांगितलं.

त्या दोघी निघून गेल्यानंतर न्यायमुर्ती रमण यांनी आपल्या सेवकाला आज्ञा केली, ‘उद्या न्यायालयात शिरण्याच्या वाटेवर सर्व जमीन खोदून व तिच्यावर पाणी ऒतून, चिक्कार चिखल कर आणि त्या दोन गवळणींना पाय धुण्यासाठी न्यायालयाच्या इमारतीच्या पुढल्या पायऱ्यांपाशी पाण्यानं पूर्ण भरलेल्या गोन घागरी ठेव. त्या चिखलातून पायरीपाशी आल्या की, प्रत्येकीला पाय धुण्यासाठी एकेक घागर तूच स्वत: दे.’

दुसऱ्या दिवशी त्या दोघीही एका पाठोपाठ एक अशा,तो वाटेतला चिखल तुडवीत न्यायालयाच्या पायऱ्यापाशी आल्या. सेवकानं प्रत्येकीला पाण्यानं पूर्ण भरलेली एकेक घागर दिली. न्यायमुर्ती चेन्नव्वानं आपल्याला दिलेल्या घागरीतील अर्ध्या पाण्यात आपले पाय अगदी स्वच्छ धुतले, आणि उरलेल्या पाण्यान अर्धी भरलेली घागर तिनं बाजूला व्यवस्थित ठेवून दिली.

तिच्या पाठोपाठ पायरीपाशी आलेल्या मल्लव्वानं मात्र सेवकानं आपल्याला दिलेली घागर तर आपल्या पायांवर पूर्णपणे रीती केलीच, पण वर चेन्नव्वानं बाजूला ठेवलेली अर्धी घागरही संपवून टाकली. एवढं करुनही तिचे पाय ती पूर्णपणे स्वच्छ करु शकली नाही ती नाहीच ! रमण हा सर्व प्रकार त्या दोघींना दिसणार नाही अशा ठिकाणाहून पाहत होते.

जेव्हा त्या दोघी गवळणी न्यायमुर्ती रमण यांच्यासमोर उभ्या राहिल्या. तेव्हा ते मल्लवाला म्हणालेव, ‘चेन्नव्वानं अवघ्या अर्ध्या घागरीत तिचे पाय स्वच्छ धुतले, तर तू पायांवर ओतलीस आणि तुझे पाय दिलेल्या पूर्ण घागरीच्या भरीला चेन्नव्वानं ठेवून दिलेली अर्धी घागरही पायावर ओतलीस आणि तुझे पाय तू चिखलाने बरबटलेलेच ठेवलेस. ही एकच गोष्ट सिध्द करते की, चेन्नव्वासारखी काटकसरी बाई तुझ्याकडून पाच शेर लोणी उसनं घेणं शक्य नाही. तुच ते तिच्याकडून घेऊन तिला बुडविले आहेस. तुझ्यासारखी धसमुसळी व उधळी बाई, घरी पन्नासच काय, पण शंभर म्हशी असल्या तरी दुसऱ्यांकडून उसने मागतच राहणार. तेव्हा तिच्याकडून घेतलेली पाच शेर लोणी तिला परत दे, आणि तिला विनाकारन त्रास दिल्या बद्दल भरपाई म्हणून तुझ्या पन्नास म्हशींपैकी तिच्या पसंतीच्या दोन म्हशी तिला दोन दिवसात दे .’