Tag Archives: कादंबरी

स्त्रियांमधील कलागुणांचा विकास

या धकाधकीच्या जीवनात महिलांना आपल्याकडे पाह्यला क्वचितच फुरसरत मिळत असते. पण हे योग्य नव्हे. तुमच्या अंगातल्या सुप्त गुणांचा विकास तुम्हीच करायला हवा. तुमच्या मुलीच्या कलागुणांचा विकास करणे हे तुमचं कर्तव्य आहे. संगीत, लेखन, नाट्य, खेळ यांसारख्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तीचं हे मार्गदर्शन नक्कीच उद्बोधक ठरेल.

एकदा एका देशात युद्धाची धुमश्चक्री चालू होती. सैनिक प्राण पणाला लावून देशाच रक्षण करत होते. अशात एक दिवस जखमी सैनिक एका तळघरात शिरला. तिथे एक लेखक शांतपणे पुढ्यात कागद घेऊन लिहीत बसला होता. वर बॉम्बचा वर्षाव होत होता. पण हा लेखक आपला जगापासून अलिप्तच होता. जसा तो सैनिक खूपच चिडला. त्या लेखकाचा त्याला भयंकर राग आला. आपल्या जखमांवर हात दाबत तो घुस्मटलेल्या स्वरात म्हणाला, तिकडे देशाची राख रांगोळी व्हायची वेळ आली आणि तुम्ही इथे शांतपणे लिहीत बसला आहात तुम्हाला आपल्या मायभूमीची, आपल्या माणसांची काही काळजी आहे की नाही ? ‘मित्रा तू हे युद्ध का लढतो आहेस ? लेखकानं शांतपणे विचारलं.
‘वा हे काय विचारणं झालं ! माझा देश, माझी माणसं वाचावी म्हणून मी प्राणपणानं लढतोय.’ शिपाई म्हणाला. ‘मी पण तेच करतोय बाबा.’
एवढं बोलून तो लेखक परत लिहू लागला. साहित्याचा पगडा, त्याची प्राणशक्ती साहित्याची ताकद ही अशी असते. उद्ध्वस्त झालेलं मन सावरणारं, रानटी वृत्तीपासून दूर ठेवणारे देशप्रेम आणि त्याहूनही माणुसकी शिकवणार ..असं हे साहित्य, वाचकाचं मनोरंजन करत, त्याला जगायला उद्युक्त करतं. त्याला आधार देतं, त्याचं खरंखुरं मित्र बनतं. त्याची सतत सोबत करतं. पण
लेखकाला लिहावं का वाटतं ?
वाचकाला वाचावं का वाटतं ?

जीवनाचा आणि साहित्याचा कोणता संबंध अस्तो ? असे काही प्रश्न साहजिकच मनात उभे राहतात. बरे वाईट अनुभव प्रत्येकालाच येतात. पण तोच अनुभव लेखकाच्या मनात कोनती आंदोलनं निर्माण करतो, त्याला आपला अनुभव सांगावा, लिहावा का वाटतो ? त्याशिवाय त्याला चैन का पडत नाही ? कथा कादंबरी वाचून, नाटक सिनेमा पाहून वाचकाला किंवा प्रेक्षकाला कोणता आनंद मोलतो ? या सगळ्या प्रश्नांचा विचार केला तर लेखन आणि वाचन यांचा अभेद्य संबंध लक्षात येतो. लेखनाशिवाय वाचकाची उपासमार होईल, पुनःअ प्रत्ययाच्या आनंदाला ते मुकतील, ही कहाणी तर माझीच, हा अनुभव तर मी पण घेतलेला, अशी सुष्ट, दुष्ट माणसं मला पण भेटलीत. असा विलक्षण अनुभव मन थरारून जोडणारा आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वाचकाच्या मनात उठतात. कारण, साहित्य हे जीवनाशी अतूटपणे जोडलेले असते.
पूर्वी कोळशाच्या खाणीत उतरताना कामगार आपल्याबरोबर पिंजऱ्यात एक विशिष्ट पक्षी घेऊन जात. या पक्षाला देवानं एक अद्भूत असं ज्ञान दिलेलं असतं. खाणीत अपघात होणार असेल, दरड कोसळणार असेल पाणी भरणार असेल तर हा पक्षी विशिष्ट प्रकारे ओरडत असे. तो धोक्याची सूचनाच असे. ते ऐकून कामगार खाणीबाहेर पडत. आपला जीव वाचवत लेखक हा असा असतो. त्याला देवानं एक विशिष्ट ज्ञान दिलेल असतं. ते त्याला उपजत मिळालेलं असतं. परिक्षा देऊन एखादा डॉक्टर होतो, इंजिनिअर होतो पण कलावंत मग तो लेखक असो, चित्रकार असो, अभिनेता असो, शिल्पकार असोल.. तो जन्मतःच असतो. .. तयार नाही होत तो. लेखनाच्या परीक्षा देऊन डिग्री नाही मिळवता येत. निसर्ग मुक्त हस्तानं इतके रंग उधळतो , पाना फुलांत, पाखरांत, आकाशात नानाविध रंग होळी खेळत असतात… ते उपजत असतात. एक हिरवा रंगच घ्या ना. निसर्गानं किती छटा त्यात भरल्यात, पियानोच जणू तो. रंगाचा … विलक्षण सिंफनीच जणू ती
तर लेखकाला अशी दृष्टी लागते. म्हणतात ना ‘ जे न देखे रवि वो देखे कवी’ त्याप्रमाणे लेखकाला भविष्याची चाहूल लागते. लेखकाचे अनुभव खरं तर त्याच्या लेखनाचा कच्चा माल मसाला असतो. आपले अनुभव मांडताना अनेक रंगछटा त्याच्या लेखनात उमटतात. तो परमन प्रवेश करू शकतो. त्याला मानवी मनाचे खेळ कळतात. एकाच बसनं प्रवास करणारे कितीतरी जण असतात. पण शेजारच्या माणसाचे हावभाव, त्याचा रंग, पोषाख, त्याच्या भाषेच्या लकबी, त्याच्या आवाजातले चढ‍उतार, त्याच्या लहानसहानहालचाली लेखक टिपत असतो. अजाणताच त्याच्या ते लक्षात येत असतं. आकाशात उडणाऱ्या चिमणीला अंगणात दगडांच्या फटीत पडलेला दाणा नाही का नेमका दिसत. त्याप्रमाणे निसर्गाचं खेळ, निसर्गाची लहर त्याच्या मनावर रंगाचे फटका ओढत आसते. मग तो लिहितो, त्याला नेमकं ते पकडता येतं. ‘झाडाचे बोट धरून आमची गाडी पळत होती’ किंवा प्रवासात पाठ दुखली की त्याच्या मनात ते दुखणे एक सुंदर वाक्य घेऊन जन्माला येते, ‘वाटत होतं, पाठीचा कणा शेंगे सारखा उकलेलं की काय.’

एखादं मन स्वतःलाच सांगते, ‘अग इतकी रडू नकोस. तुझ्या अश्रूनी तुझी चिता विझून जाईल..’ दुखाची तीव्रता किती पटकन वाचकाच्या मनात बिंबते म्हणजेच अनुभवाची तीव्रता, अनुभव घेण्याची ताकद जितकी मोठी तितका लेखक मोठा, तरीपण मनाच्या पातळी वर जी कल्पना कोरली जाते ती तशीच्यातशी कागदावर उतरत नाही. कारण शब्द असे आपल्या सर्व रंग, रूप, आकार, गंधासह कागदावर उतरतात तसे आडपण येतात. मनातले भाव नेकके पकडता येत नाही. लेखणी आणि कागद यामध्ये लेखन घडत असतं. लेखकाच्या मनोभूमीत सतत अनूभव, कल्पना विचार, यांचं बी पडत असतं आणि त्याच वेळेला त्याला हे ही कळत असतं की या कल्पनेतून शेवटी काय निघणार ? साधं गवत की वटवृक्ष ! कथा की कविता, की कांदबरी, की नाटक ! एकदम तो घाट घेऊनच ती कल्पना समोर साकार होते. चित्रमयी भाषा आपल्याही नकळत कागदावर उतरत जाते… ‘ तिच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहिलं, कच्चं फळ तोडावं असं… ’ वेडे शब्चात मावतं ते दूःख नाही, दुःख मावते ते फक्त मनात, मना एवढं मोठं आणि मनाएवढं लहान दुसरं काही नाही माणसाजवळ’ ‘पाण्यात चंद्र दुमडावा असं तिच्या गालावरचं गोंदण हसताना तिच्या गालात दुमदलं जात होतं.

‘तो आईकडे, अक्काकडे पहात होती. वेड लागलेल्या माणसाची पाठ कशी दिसते म्हणून शोध घेत होती. दोघीच्या, मणक्यांच्या खुंटाळ्यावर कितीतरी दुःखाची लक्तरं लोंबत होती. अशी ही वाक्ये सुचत जातात. आपोआप. पण हीच अक्षरं कधीकधी हट्टी मुलासारखी हटून बसतात. जे सांगायचंय ते शब्दात गोवताच येत नाही माग किती यातना होतात किती तडफड होती जिवाची. तर लेखन हे सतीचं वाण आहे. ते सहजासहजी हाती लागत नाही. आतून उमाळे फुटावे लागतात. कल्पनेचे धुमारे अंगभार उमलावे लागतात. भाषा कमवावी लागते. वाचावं लागतं. उघड्या डोळ्यांनी, अत्यंत संवेदनक्षम त्याचं क्षण नि क्षण असावा, अनुभवावा लागतो. लेखनासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. वारंवार लिहावे लागते. विविध प्रकारचे ज्ञान लागतं. ललित लेखक असला तरी त्याला चौफेर माहिती असावी लागते, डोळसपणे प्रवास करावा. इतिहास भूगोल कळावा लागतो. मानसशास्त्र याचं ज्ञान लागतं. चार ठिकाणी चार माणसात जावे, यावं लागतं. अर्थात या गोष्टी प्रत्येकजण करतच असतो पण लेखकाचा पिंड जोपासायचा असेल तर खोल बुडी मारून माणसांच्या मनाचा तळ गाठावा लागतो.

आणखी एक सांगावं वाटतं, हल्ली स्त्रियांची मासिक उंदड झाली आहेत. दहा पाच रुपये देऊन किंवा घेऊनही किंवा फुकटसुद्धा तुमचे लेखन छापलं जातं. अशा लेखनाचा आनंद लेखकालाही मिळत नाही. वाचकाला पण जमत नाही. लेखक म्हणून आपले नाव आपल्या वैशिष्ट्यसह चमकल तर ते खरं, काहीतर तो पोष्टाचा शिक्काच. तोच मुखवटा, तोच आकार, तितकंच सर्वसामान्य. आयुष्यरूपी भांड्याला पोचे पडायला हवेत. तीव्र दुःख भयानक निराशा, जीवघेणी प्रतारणा यातून कलाकार निर्माण होतो. माणुसकीचा साक्षात्कार, माणसातला पशू, माणसातील देवत्य त्याला अंतर्बाह्य ढवळून टाकतं… मनाची अशी ही उलथापालथ लेखकाला आवश्यक असते. जगण्यासाठी धडपड चार घास अन्नासाठी अपार, कष्ट अन्याय, असल्याचा विचार, मानवतेचा पराभव, भूक मनात दुःखाचे डोंगर सोसणारं मन, असे एक ना दोन कितीतरी विषय आपल्याभोवती सतत घडत असतात. दिसत असतात नजर पाहिजे. लिहिल्याशिवाय, आपला अनुभव मांडल्या शिवाय झोप येत नाही अशी उन्मनी अवस्था पाहिजे. जितका तीव्र, सच्चा, विदारक अनुभव तितकेच शब्द ताकदीचे, सच्चे आणि थंड काळजाला भिडणारी शैली जन्माला येतेच. आपल्या लेखणीचा कस आपल्याला आधी कळला पाहिजे, वाचकापर्यंत तरच पोहचतो.- त्याच्या काळजाला ते शब्द भिडतात.

लेखकाला उत्तम, सुजाण वाचक मिळणे अत्यंत आवश्यक असतं. आकस न ठेवता टीकाकार भेटणे अगत्याचं असतं. बेस्ट सेलर लेखक खूप असतात. पण ते काळाच्या प्रवाहात टिकत नाही. भडक, अतिरंजित, भावविवश, रहस्यप्रधान प्रेमाचा त्रिकोण रंगवणारे साहित्य खूप वाचले जाते. त्या लेखकाची पुस्तकंही खपतात. त्याला भरपूर पैसाही मिळतो. या सगळ्या गोष्टी उत्तम लेखकाच्या वाट्याला येतीलच असं नाही. पण त्याचा वाचक सुजाण असतो. चोखंदळ असतो. उत्तम साहित्याची आवड वाचकात निर्माण करण्याची त्याची ताकद असते. हेच त्याच्या यशाचे गमक. समाजाला डोळस करणे, त्याला सावधकरणे, त्याला संकटात, आपत्तीत मानसिक बळ देणे, त्याचे प्रबोधन करणे… या सगळ्या गोष्टी ललित लेखकावर बंधनकारक नाहीत. त्याच्या कधा, कादंबरीतून उपदेशाचे डोस पाजण्याचा त्याचा मनोदय नसतो. सुधारणेचा हेतू ठेवून तो लिहित नसतो. तरी पण अप्रत्यक्षपणे तो वाचकाला पुनः प्रत्ययाचा आनंद देत असतो. त्याच्यापुढे मानवी मनाचा अत्यंत गूढ, गुंतागुंतीचा नमुना पेश करत असतो.

सिनेमा नाटकाची आवड, व्याख्यान ऐकण्याची आवड तशीच चांगले उत्त्म साहित्य वाचनाची आवडं लावून घ्यायला हवी, जोपासायला हवी. आता अमुक एक पुस्तक चांगले आहे क हे कसं कळावं ? तर दैनिकातून, मासिकातून पुस्तक परिक्षणं येत असतात. मैत्रिणींच्या मेळाव्यात साड्या, दागिने, याची चर्चा करण्यापेक्षा एकमेकीला काय वाचले-कसे वाटले हे सांगण्याची सवय लावून घ्यायला हवी. अमुक नाटक, सिनेमा वाईट आहे हे कळूनही आपण स्वतः पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. . तसंच नित्य काही तरी वाचल्याशिवाय दिवस अपुराच राहिला ही भावना बळावली पाहिजे. क्वचितच एखादं पुस्तक चांगलं, उत्तम असं हाती लागेल पण तो क्वचित मिळालेला आनंद केवढा मोलाचा, केवढा आनंदाचा ठरेल ! चिरंजीव ठरेल ! आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास अशाच अनेक उत्तम गोष्टींनी होत असतो. त्यातून होणारा साक्षात्कार म्हणजे विश्वरूपदर्शनच.