Tag Archives: किडनी

मुत्रमार्गातील खडे व उपचार

मुत्रमार्गातील खडे, समज गैरसमज, समस्या व उपचार पद्धती

मुत्रमार्गातील खडे

कोकण किनारपट्टीत नेहमी आढळणारा आजार म्हणजे मुत्रमार्ग व किडनीतील खडे/ स्टोन त्याच्या सोबतच्या गैरसमजूती बऱ्याच आहेत उदा. लक्षणावरून इतर तपास न करता मुतखड्याचे निदान करणे व त्याच्या बरोबर गावठी उपाय व गोळ्या चालू करणे एकदा निदान झाल्यावर गोळ्या किंवा गावठी उपाय वर्षानुवर्षे चालू ठेवणे ( बऱ्याच वेळा किडनीवर त्याचे दुष्पपरिणाम होवून ती काम करणे बंद होते.) सोनोग्राफी करुन घेणे व योग्य सल्ला न घेता तसेच गोळ्या चालू करणे पित्तपिशवीच्या खड्यांविषयी गोळ्या चालू ठेवण्याबाबत अशाच गैरसमजूती आढळतात. पोटात दुखत असल्यास दुखीचे इंजेक्शन घेणे. बऱ्याच वेळा मुत्रमार्गात मुतखडा अडकून भयंकर वेदना होतात त्यावेळी तपास करुन निदान न करता लोक परत परत दुखीवरचे इंजेक्शन घेत राहतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण यामुळे आजार बळावून किडनीचे कार्य कमी होते, ती काढावी सुद्धा लागू शकते.

मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?

  • पाणी भरपूर पिणे.
  • लघवी तुंबवून न ठेवणे.
  • काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून घेऊन त्याप्रमाणे पथ्य करावे.

मुतखड्याची लक्षणे कोणती?

  • पोट दुखणे.
  • लघवीला त्रास होणे.
  • लघवी तुंबणे.
  • कधी कधी जंतूचा होऊ व ताप येणे.
  • लघवीतून रक्त जाणे.

मुतखड्याचे निदान करण्यासाठी काय करावे?

  • लघवीची तपासणी करणे, त्यामध्ये लघवीतील रक्तपेशी व जंतंच्या प्रादुर्भावचे निदान होते.
  • सोनोग्राफी जी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसली आहेत का? किडनीला त्याचा काही त्रास आहे का? या सर्वांची उत्तरे आपल्याला सोनोग्राफीतून मिळतात पण त्याच्याबरोबर नुसती सोनोग्राफी करुन भागत नाही त्याच्याबरोबर इतर तपास, लक्षणे व सर्व रिपोर्टचा एकत्रित विचार करुन मग त्याच्यावर उपचार ठरवावे लागतात. रक्त तपासणी करुन किडनीचे कार्य कमी झालेले नाही ना हे तपासावे लागते.

एकदा निदान झाल्यावर काय उपचार करु शकतात?
उपाय हे मुतखड्याचा आकार, स्थान, जंतूचा प्रादुर्भाव किदनीला होणारा त्रास, इतर रिपोर्टस यावर अवलंबून असतात.

एक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते.
काही मुतखडे निदान झाल्याझाल्या लगेच काढावे लागतात काही मुतखडे एकाद दुसरा महीना थांबून तुम्ही बघू शकता पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले आहेत का? हे अधून मधून बघावे लागते. तर काहींना काहीच करावे लागत नाही. वरील निर्णय घेण्यासाठी / युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.