Tag Archives: कॉंग्रेस

मुळशी हिल स्टेशन उभारण्याबाबत प्रश्नचिन्हे

मुळशी

मुळशी

राज्यस्तरीय वन व पर्यावरणसंबंधित तज्ज्ञ समितीने आक्षेप घेतला आहे की, ‘मुळशीत नवे हिल स्टेशन उभे राहण्याची परवानगी देताना वन व पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची शक्यता आहे व यामुळे अशा गोष्टी घडू नयेत.’ मुळशी येथे हिल स्टेशनला राज्य सरकारने परवानगी दिली होती पण त्या आधीच पर्यावरण विभागाने त्याला ‘लाल सिग्नल’ दाखविला आहे.

राज्य सरकारने लवासानंतर मुळशी तालुक्यातील मौजे सालतर, माजगांव बार्पे बु, भांबर्डे, एकोले, घुटके, आडगाव या गावांवर खसगी हिल स्टेशनला परवानगी दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र व्हॅली व्ह्यू कंपनीकडून वन व पर्यावरणासंदर्भातील राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीपुढे आला. राज्यस्तरीय तज्ञ समितीची बैठक १२ ते १४ मार्च या काळात झाली व या विषयावर विचार करण्यात आला. या समितीच्या अहवालात स्पष्ट केले आहे की, ११ फेब्रुवारी रोजी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी गावांची पाहणी केली. ही गावे वनराईने नटलेली आहेत व ती पवना आणि मुळशी धरणाच्या कॅचमेंट एरियात येतात. इकोसेन्सिटिव्ह व जैवविविधता असलेल्या या पावसाच्या प्रदेशात एक खासगी हिल स्टेशन उभे करणे कितपत योग्य आहे, हा मोठा प्रश्नचिन्ह समितीने उभा केला आहे.

महानगरांत राहणाऱ्या काही उच्चभ्रू पर्यटकांसाठी पर्यावरणाबरोबरच इथल्या जैवविविधतेलाही धोका पोहोचू द्यायचा का, असा सवाल समितीने केला आहे. पश्चिम घाटावर खासगी हिल स्टेशनमुळे स्थानिक लोकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे येतात, असा समितीने अभिप्राय केला आहे. या हिल स्टेशनला राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे हा कोणाचा प्रकल्प आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. या नव्या हिल स्टेशन उभारणाऱ्या कंपनीवर दिल्लीतील कॉंग्रेस हायकमांडचे वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. या हिल स्टेशनला त्यामुळेच तातडीने परवानगी मिळाली असल्याचे कळत आहे.