Tag Archives: कॉम्प्युटर

व्यवसाय व कुटुंब

पूर्वी, किंबहुना आजही, खेडोपाडी बहुधा एका कुटुंबाचा एकच व्यवसाय असतो. शेती, लोहारकाम, दुकानदारी, शिंपीकाम वगैरे. त्याच व्यवसायात पुरुष, स्त्रिया, मुले आपापल्या इतर जबाबदाऱ्या सांभाळून सहभागी होत असत. आता दृष्टीकोन जरा बदलला आहे – व्यवसाय चढ‍उतार होत असतो. सुरक्षितता म्हणून एखाद्याने तरी ठराविक वेतन देणारी नोकरी पत्करावी असे कुटुंबाला वाटते.
व्यवसायातील कौशल्य हे लहानपणापासून हळूहळू आत्मसात केले जाऊ शकते. आजही आपण पाहतो की, सोय म्हणून एक डॉक्टर, डॉक्टर झालेल्या मुलींशी लग्न करतो. त्यांची मुलेही साधारणपणे घरी उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा, नावलौकिक इत्यादींमुळे डॉक्टरच बनतात. अशा प्रकारे थोडेबहुत व्यावसायिक स्थैर्य व त्यातून कुटुंबाची रचना होते.

आज स्त्रियांनाही आर्थिक जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. आई व वडील दोघेही दिवसाचा बराच वेळ घराबाहेर असतात. त्यामुळे अपरिहर्यपणे पाळणाघरे, शिशुमंदिरे, संस्कारवर्ग आणि वृद्धाश्रमही निर्माण झाले व त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चिंतेची बाब अशी आहे की, पालकांचा दृष्टिकोन मुलांना ‘अडकवून टाकण्या’चा असतो तर चालकांचा फक्त पैसे घेऊन सांभाळण्याचा असतो. संस्कारांचा फारसा विचार केला जात नाही. वृद्धांच्या बाबतीतही ठराविक पैसे पाठविले की, आपली जबाबदारी संपली, असा भाव निर्माण होऊ लागला आहे. मुलांना खायला प्यायला दिले ( तेही पोषकतेचा विचार न करता मुलांच्या इच्छेनुसार दिले जाते ), पुस्तके आणून दिली, कपडेलत्ते दिले, खेळखेळणी दिली, वेगवेगळ्या वर्गात ( छंद वर्ग, व्यक्तिमत्त्व शिबिरे, कॉम्प्युटर कोर्स ) पाठवले की काम झाले, असे पालकांना वाटू लागले आहे. समाज कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातील लोक हे तर आपल्याच धुंदीत असतात.