Tag Archives: कोकरू

लांडगा आणि कोकरू

एका कोकरास उन्हाच्या तापाने फार तहान लागली म्हणून एका ओढयावर ते पाणी प्यावयास गेले. तेथे वरच्या लांडगा पाणी पीत होता, त्यास पाहताच, ते कोकरू ओढयाच्या खालच्या बाजूस येऊन पाणी पिऊ लागले. कोकरू दृष्टीस पडताच, काही तरी निमित्ताने कळ काढून, त्यास मारून खावे, असे लांडग्याच्या मनात आले. मग तो त्या कोकरास म्हणतो, ‘काय रे, हे पाणी गढूळ केलेस, आता मी आपली तहान कशी भागवू? माझा असा अपमान तू काय म्हणून केलास? बोल, नाहीतर आताच तुला मारून टाकतो. कोकरू बिचारे घाबरले आणि पाया पडून म्हणाले, ‘लांडगे दादा, तू म्हणतोस हे होईल कसे ? तुझ्याकडून जे पाणी वहात आले, ते मी प्याले; असे असता मी गढूळ केलेले पाणी तुझ्या बाजूस उलटे कसे चढले ?’ लांडगा म्हणाला, ‘ते असो; पण तू लबाड आहेस. आज सहा महिने, माझ्या मागे, तू मला शिव्या देत आहेस, असे माझ्या कानी आले आहे.’ कोकरू म्हणाले, ‘छे! छे! अशी गोष्ट होईल तरी कशी ? मला जन्मून अदयाप पुरते तीन महिनेही झाले नाहीत; असे असता, तुला मी सहा महिन्यांपूर्वी शिव्या दिल्या, हे तुला खरे तरी कसे वाटते ?’ कोकराचे भाषण ऐकून लांडगा अगदी कुंठीत झाला. मग, रागाचा मोठा आवेश आणून, डोळे वटारून, हातपाय आपटीत तो कोकराजवळ आला आणि दात खाऊन म्हणाला, ‘लुच्चा ! तू मला शिव्या दिल्या नसल्यास, तर तुझ्या बापाने दिल्या असतील, एकूण एकच !’ असे म्हणून त्याने त्या गरीब कोकराचा तात्काळ प्राण घेतला !

तात्पर्य:- जो बलवान आणि घातकी आहे, त्यापुढे आपला खरेपणा चालत नाही. बळी तो कान पिळी.