Tag Archives: खरेदी

चतूर विक्रेता

एक बाई चादरीच्या दुकानात गेली. दुकानातील विक्रेत्याने एका मागून एक, अशा जवळजवळ सत्तर ऎंशी नाना तऱ्हेच्या चादरी तिला दाखविल्या, पण त्यातली एकही चादर तिच्या मनात भरेना !प्रत्येक चादरीवर नजर टाकून ती म्हणे, ‘ऊंऽहू ! अशा तऱ्हेची चादर तर मी इतर दुकानातही पाहिली आहे. मला अशी चादर दाखवा, की जी इतर चादरींपेक्षा काहीतरी खास वैशिष्ट्य असलेली असेल. अशी चादर दाखवलीत, तर त्या तऱ्हेच्या पाच सहा चादरी मी एकदम खरेदी करीन.’

‘असं आहे होय ?’ असं म्हणून, त्या विक्रेत्याने दुकानात उरलेल्या पूर्वी दाखविलेल्याच चादरीसारख्याच असलेल्या चादरींचा गठ्ठा बाहेर काढला आणि त्यातल्या पाच सहा चादरी त्या बाईपुढे पसरुन तो तिला मुद्दाम म्हणाला, ‘बाईसाहेब ! मी सांगतोय ती गोष्ट वाट्टेल त्या गिऱ्हाइकाच्या लक्षात येणार नाही, पण तुम्हाला सहज कळेल, म्हणून मी या चादरींच वैशिष्ट्य सांगतो. या गठ्ठयातील प्रत्येक चादरीची कडा आणि किनार समांतर असून; प्रत्येक चादरीचा मध्य, बरोबर केंद्रस्थानी आहे.’

विक्रेत्यानं सांगितलेलं हे वैशिष्ट्य कानी पडताच, त्या बाईनं एकदा त्या चादरी उलगडून त्यांच्यावर नजर टाकली आणि ‘अय्या खरचं ! यांना म्हणतात वैशिष्ट्यपूर्ण चादरी !’ असं म्हणून, त्यातल्या सहा चादरींची खरेदी केली व मोठ्या प्रसन्न मनानं ती त्या दुकानातून बाहेर पडली.