Tag Archives: खारवडे

बाजरीचे खारवडे

साहित्य;

  • एक किला बाजरी
  • अर्धा किलो तांदूळ
  • दोन टेबलस्पून
  • जिरे
  • तेल
  • मीठ

कृती:

बाजरी निवडून घ्यावी. बाजरी साधारण ओलसर करून उखळामध्ये सडून घ्यावी किंवा खलबत्त्यात थोडी कुटून घ्यावी, जेणेकरून बाजरीची साले निघून जातील. सडून घेतलेली बाजरी पाण्यात आठ दिवस भिजत घालावी. मात्र दररोज पाणी बदलावे. बाजरी भिजत घातल्यानंतर चार दिवसांनी वेगळ्या पाण्यात तांदूळ भिजत घालावेत. तांदळाचे पाणीही दररोज बदलावे.

पाणी रोज बदलल्यामुळे बाजरी व तांदळाचा आंबट वास येत नाही. याप्रमाणे आठ दिवस भिजवलेली बाजरी व चार दिवस भिजवलेले तांदूळ नवव्या दिवशी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. वाटलेल्या मिश्रणात पाणी टाकून सोजीच्या चाळणीने थोडे थोडे गाळून घ्यावे. वाटलेला चीक व पाणी एकत्र करून राहिलेला कोंडा बाजूला काढावा. असा तयार केलेला चीक रात्रभर न हलवता ठेवून द्यावा. सकाळी भांडय़ात वर निवळलेले पाणी जमा होते ते टाकून द्यावे व खाली राहिलेला चीक खारवडे करण्यासाठी वापरावा. एका मोठय़ा जाड पातेल्यात एक पळी तेल गरम करून घ्यावे. त्यात जेवढा चीक असेल तेवढेच पाणी घालावे. आपल्या आवडीनुसार मीठ व जिरे टाकावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चीक घालून एकसारखे हलवावे, जेणेकरून चिकाच्या गाठी होणार नाहीत. मध्यम आचेवर चीक चांगला शिजवून घ्यावा. नंतर आच कमी करावी. शिजवलेला चीक गरम-गरमच सोऱ्यात भरावा. लाकडी पाट किंवा प्लास्टिक कागदाला थोडा तेलाचा हात फिरवून त्यावर चकलीचा सोऱ्या वापरून चकलीप्रमाणेच खारवडे करावेत. कडक उन्हात वाळवावेत व हवे तेव्हा तळून खायला द्यावेत.