Tag Archives: डाळीचे पीठ

पालक पुलावा

पालक पुलावा

साहित्य :

 • २ वाट्या तांदूळ
 • २ पालकच्या जुड्या
 • ३/४ वाटी डाळीचे पीठ
 • २ चमच धणे पूड
 • ४-५ हिरव्या मिरच्या
 • १/२ चमचा हळद
 • लहानसा आल्याचा तुकडा
 • २५ ग्रॅम काजू
 • २ कांदे
 • ४-५ लवंगा
 • दालचिनीच्या ३-४ काड्या
 • ३-४ वेलदोडे
 • १०-१२ काळे मिरे
 • मीठ
 • १/२ वाटी दही

कृती :

पालक पुलावा

पालक पुलावा

पालकाची पाने हातानेच काढून घ्यावीत व धुऊन अगदी थोड्या पाण्यात वाफवून घ्यावीत. नंतर चाळणीवर ओतून सर्व पाणी काढून टाकावे.

नंतर पालक, मिरच्या, आले वाटून घ्यावे. तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत. थोड्या तुपावर डाळीचे पीठ जरा भाजून घ्यावे.

नंतर हळद, मीठ, धणेपूड, वाटलेला पालक व डाळीचे पीठ एकत्र करुन त्याचे छोटे छोटे गोळे करुन तळून घ्यावेत. सर्व मसाला थोड्या तुपावर भाजून घ्यावा.

कांदा उभा चिरुन घ्यावा व थोड्या तुपावर कांदा लालसर रंगावर येईपर्यंत परतून घावा. काजूही बदामी रंगावर येईपर्यंत परतून घ्यावेत. कांदा व काजू बाजूला ठेवावेत.

थोड्या तुपात २ लवंगा व २ वेलदोडे टाकून फोडणी करावी. त्यात तांदूळ घालून जरा परतावेत. नंतर त्यावर वाटलेला मसाला घालावा. १/२ वाटी दही व मीठ घालून भात करुन घावा.

निखार्‍यावर किंवा कुकरमध्ये भात गरम राहील असाच ठेवा. आयत्या वेळी भात उकरुन काढल्यावर त्यावर पालकाचे गोळे, कांदा व काजू घालून वाढावा. हा भात फारच रुचकर लागतो.