Tag Archives: तांदुळ

पानपोळी

साहित्य :

  • २ वाट्या तांदळाचे पीठ
  • १ मध्यम नारळ
  • साखर किंवा गूळ
  • ३ वेलदोडे (पूड)
  • ४ चिमट्या जायफळाची पूड
  • केळीचे फाळके
  • १ चमचे ताजे लोणी किंवा रिफाईन्ड तेल
  • पाव चमचा मीठ

कृती :

तांदळाच्या पिठीत तेल, मीठ व वाटीभर पाणी घालून पीठ भिजवा. लागल्यास थोडे अधिक पाणी घालावे. नारळ खरवडून कीस मापून घ्यावा. त्याच्या निम्मी साखर किंवा बारीक चिरलेला गूळ घेऊन त्यात मिसळावा व हे मिश्रण मंद आंचेवर शिजत ठेवावे. जरा चिकट होऊन घट्ट होऊ लागले की खाली उतरवून गार होऊ द्यावे. वेलची जायफळ घालावे.

केळीचे फाळके धुवून घ्यावे. किमान सहा इंच लांबीरुंदीचे तुकडे करावेत. एका पानाच्या ओल्या तुकड्यावर दोन मोठे चमचे पीठ पसरावे. गोलाकार पीठ डावाने पसरावे. निम्म्या भागावर एका मोठा चमचाभर नारळाचे सारण घालून पसरावे. उरलेल्या निम्म्या भागाचे पान सारणाच्या भागावर दुमडावे. बोटाने कडा अलगद दाबाव्या म्हणजे पानपोळी फुटणार नाही. अशा ३-४ पोळ्या करून मोदकाप्रमाणे चाळणीवर ठेवाव्या. सुमारे १५-२० मिनिटे उकडावा. खायला देताना पान काढून वाढाव्या. साजूक तूप व चटणी-लोणचे बरोबर द्यावे.